अव्वल क्रीडापटूंबाबतचा तपशील रशियाच्या हॅकर्सतर्फे उघड

खेळांना असलेला उत्तेजकांचा विळखा सोडवण्यासाठी प्रयत्नशील जागतिक उत्तेजकविरोधी संघटना अर्थात ‘वाडा’च्या गोपनीय माहितीवर सायबर हॅकर्सनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘वाडा’तर्फे गुप्तता राखण्यात येणाऱ्या खेळांडूंविषयक वैद्यकीय माहिती हॅकर्सनी जाहीर केली आहे. ऑलिम्पिक पदकप्राप्त धावपटू मो फराह, टेनिसपटू राफेल नदाल यांच्यासह गोल्फपटू जस्टीन रोस यांच्याबाबतची माहिती हॅकर्सनी मिळवली आहे.

इंग्लंडच्या मो फराहने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ५००० आणि १०००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. रोसने गोल्फमध्ये ११२ वर्षांनंतर सुवर्णपदकाची कमाई केली. १४ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या टेनिसपटू राफेल नदालने रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष दुहेरीत मार्क लोपेझच्या साथीने सुवर्णपदकावर नाव कोरले.

‘एपीटी२८’ आणि ‘फॅन्सी बीअर’ अशा नावांच्या हॅकर्स गटाने संघटनेच्या उत्तेजकविरोधी प्रशासन आणि व्यवस्थापन यंत्रणेवर ताबा मिळवत माहिती प्राप्त केल्याचे ‘वाडा’ने स्पष्ट केले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या खात्यातून ही माहिती गहाळ झाली आहे.

फराहसंदर्भातील माहिती फॅन्सीबीअर.नेट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार ऑलिम्पिक स्पर्धेवेळी फराहला उपचारात्मक सूट मिळण्याला परवानगी नसल्याचे उघड झाले आहे. खेळाडूंसाठी प्रतिबंधित करण्यात आलेली द्रव्ये उपचारांचा भाग म्हणून सेवन करण्याची सूट विशेष परवानगी म्हणून देण्यात येते. या तिघांनी कोणतीही आचारसंहिता मोडल्याचे स्पष्ट झालेले नाही.

फराहला सलाइनच्या माध्यमातून प्रतिबंधित द्रव्यांचा समावेश असलेले औषधे ३ ते ५ जुलै २०१४ या कालावधीत देण्यात आली. मात्र यासाठी आवश्यक परवानगी त्याच्याकडे नव्हती.  एका शर्यतीदरम्यान धावताना कोसळल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचारांदरम्यान हा प्रकार घडला. २००८ मध्ये एका विशिष्ट द्रव्याच्या ८० मिलिग्रॅम सेवनाची परवानगी ‘वाडा’ने त्याला दिली होती. यंदाच्या वर्षांत मे ते जून या कालावधीत उपचारांचा भाग म्हणून प्रतिबंधित असलेल्या द्रव्याच्या सेवनाची परवानगी गोल्फपटू रोसला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. टेनिसपटू राफेल नदालला २००९ आणि २०१२ मध्ये नदालला उपचारादरम्यान सवलत म्हणून प्रतिबंधित द्रव्याच्या सेवनाची परवानगी देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

फॅन्सी बीअर आणि तत्सम समूहाचा ‘वाडा’च्या गोपनीय माहितेवर कब्जा करण्याची ही चौथी वेळ आहे. फॅन्सी बीअर संघटनेने याआधी अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बिलेस, इलेना डेले डोन, सेरेना आणि व्हीनस विल्यम्स यांच्यासह इंग्लंडची सायकलपटू ब्रॅडले विगिन्स आणि ख्रिस फ्रूम यांच्याबाबतची माहिती प्रसिद्ध केली होती. या तिघांव्यतिरिक्त फ्रान्निस नियोनसाबा, कॅल्युम स्किनर, हेलेन ग्लोव्हर यांच्यासह २६ अव्वल क्रीडापटूंसंदर्भातील गोपनीय माहिती ‘फॅन्सी बीअर’ने चव्हाटय़ावर आली आहे. संस्थेची प्रतिमा डागाळावी यासाठी गोपनीय माहितीवर हल्ला करण्यात आल्याचे ‘वाडा’ने म्हटले आहे. रशियातील सरकार पुरस्कृत उत्तेजकांचा महाघोटाळा ‘वाडा’ने उघडकीस आणला होता. या कारवाईचा सूड म्हणून गुप्त माहितीवर आक्रमण करण्यात येत असल्याचेही ‘वाडा’ने स्पष्ट केले.