प्रतिबंधित उत्तेजक सेवन आणि भ्रष्टाचारप्रकरणी माझ्यावर फौजदारी खटला दाखल होऊ शकतो, अशी भीती रशियाचे माजी अ‍ॅथलेटिक्स प्रमुख व्हॅलेनटिन बॅलकनिसेव्ह यांनी व्यक्त केली. याप्रकरणात सहभाग नसल्याचा दावाही त्यांनी केला.
२००१ ते २०१४ या कालावधीत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाचे खजिनदार म्हणून बॅलकनिसेव्ह कार्यरत होते. रशियाच्या क्रीडापटूंनी प्रतिबंधित उत्तेजकांचे सेवन केल्याचे प्रकरण दडपण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी बॅलकनिसेव्ह यांच्यावर महासंघाच्या आचारसंहिता समितीने आजीवन बंदी घातली होती. १९९१ ते २०१५ या कालावधीत रशिया अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे प्रमुख या नात्याने खेळात उत्तेजक सेवनासारखे प्रकार होऊ नयेत यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्याचे
बॅलकनिसेव्ह यांनी एका खाजगी वाहिनीली दिलेल्या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले.
‘‘अ‍ॅथलिट्सला हात पकडून थांबवू शकत नाही. माझ्यापरीने जे करता येईल ते मी केले अशी सारवासारवही त्यांनी केली. फ्रान्समधील आर्थिक खटल्यादरम्यान जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने माझ्याविरोधात आंतरराष्ट्रीय वॉरंट काढण्याच्या प्रयत्नात आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास माझ्यावर खटला दाखल होऊ शकतो आणि मला त्याचीच सर्वात जास्त भीती आहे,’’ असे बॅलकनिसेव्ह यांनी सांगितले.