पुणे : भारतीय संघात स्थान मिळवणारा पुणेकर फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या आनंदाला पारावार नव्हता. श्रीलंका दौऱ्यावर लक्षवेधी कामगिरी करीन, असा विश्वास ऋतुराजने व्यक्त केला.

पुढील महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. यासाठी गुरुवारी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यातील सहा बिगरआंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये २४ वर्षीय ऋतुराजचा समावेश आहे.

‘‘मला अतिशय आनंद झाला आहे. क्षणभर डोळ्यांसमोर आतापर्यंतचा प्रवास उभा राहिला.  या प्रवासात सदैव पाठीशी राहणारे कुटुंब, मित्र आणि प्रशिक्षक यांचा मी आभारी आहे,’’ असे ऋतुराजने सांगितले. ऋतुराजने ५९ अ-श्रेणी सामन्यांत ४७ हून अधिक सरासरी राखली आहे.

परिस्थितीनुरूप खेळणे हे ऋतुराजच्या खेळाचे वैशिष्टय़ आहे. ‘‘संघाच्या गरजेनुसार दोन्ही पद्धतीने मला खेळता येते. हेच माझे बलस्थान आहे,’’ असे ऋतुराजने सांगितले. गतवर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट हंगामात ऋतुराजने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना लक्ष वेधून घेतले होते.

प्रत्येक खेळाडूला सामन्याची संधी मिळेल -द्रविड

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला सामन्यात खेळण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील राहीन, असा विश्वास प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला आहे. भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) आणि ‘अ’ संघामधील गुणवत्ता जोपासण्याचे श्रेय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक द्रविडला दिले जाते. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुलकडे सोपवण्यात आले आहे. ‘‘मी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना सांगू इच्छितो की, तुम्हाला श्रीलंका दौऱ्यावर नक्की सामना खेळायची संधी मिळेल. मी जेव्हा भारतीय ‘अ’ संघातून दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा मला सामना खेळायची संधी मिळाली नव्हती. तो अनुभव माझ्यासाठी वाईट होता,’’ असे द्रविडने सांगितले.