आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बंदीची शिक्षा भोगत असलेल्या एस. श्रीशांतने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. २०१३ साली गाजलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीशांतसह राजस्थान रॉयल्सच्या अंकित चव्हाण आणि अजित चांडेलालाही अटक करण्यात आली होती. यावेळी राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. या काळात द्रविडने आपल्या संघाची चांगली पाठराखण केली. मात्र, मला ओळखत असुनही द्रविड माझ्या मागे उभा राहिला नाही. महेंद्रसिंह धोनीनेही माझ्या मोबाईल मेसेजला उत्तर दिलं नाही, असं म्हणत श्रीशांतने आपली खंत व्यक्त केली.

अवश्य वाचा – आजीवन बंदीप्रकरणी श्रीशांत सर्वोच्च न्यायालयात जाणार

रिपब्लिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रीशांतने अनेक बाबींचा उलगडा केला. “या प्रकरणी भारताचे सहा ते दहा खेळाडू दिल्ली पोलिसांच्या रडारवर होते. जर या ६ खेळाडूंची नावं बाहेर आली तर मग भविष्यकाळात क्रिकेट या खेळावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. बीसीसीआय एक खासगी संस्था आहे. त्यामुळे टीम इंडियाला तांत्रिकदृष्ट्या भारताचा संघ म्हणता येणार नाही. जर मला खेळण्याची संधी मिळाली नाही, तर आगामी काळात दुसऱ्या देशाच्या संघाकडून क्रिकेट खेळण्यास मागे पुढे पाहणार नाही.”

अवश्य वाचा – बीसीसीआय अन्याय करत असेल तर श्रीशांतने पुरावे द्यावे – कपिल देव

इतर देशांतील टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी श्रीशांतने मध्यंतरीच्या काळात बीसीसीआयकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. मात्र, बीसीसीआयने श्रीशांतची विनंती साफ धुडकावून लावली होती. यानंतर बीसीसीआय आणि श्रीशांत यांच्यात सध्या न्यायालयीन लढा सुरु आहे. केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवर घातलेली बंदी उठवण्याचे आदेश दिल्यानंतर बीसीसीआयने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं. यानंतर केरळ उच्च न्यायालयातील खंडपीठाने श्रीशांतवरची बंदी कायम ठेवली होती. यानंतर श्रीशांतने बीसीसीआय आपल्याशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे श्रीशांतने केलेल्या वक्तव्यावर राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी काय स्पष्टीकरण देतात, हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – बंदी बीसीसीआयने घातली, आयसीसीने नव्हे; दुसऱ्या देशाकडूनही खेळू शकतो: श्रीशांत