भारतीय संघाचे माजी सहायक प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी आपल्या पुस्तकात, भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड आणि एस.श्रीशांत यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. आपल्या Barefoot Coach या पुस्तकात अपटन यांनी हा धक्कादायक प्रसंग विशद केला आहे.

२०१३ साली स्पॉट फिक्सींग प्रकरणी तत्कालीन राजस्थान रॉयल्स संघाचे खेळाडू श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अपटन यांनी पुस्तकात केलेल्या दाव्याप्रमाणे, १६ मे रोजी तिन्ही खेळाडूंवर अटकेची कारवाई करण्याआधी श्रीशांतची संघातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याच्या संघासमोरील विक्षिप्त वागण्यामुळे पॅडी अपटन आणि राहुल द्रविड यांनी श्रीशांतला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. मात्र श्रीशांतने अपटन यांचे आरोप फेटाळून लावले असून, अपटन हा खोटारडा माणूस असल्याचं श्रीशांतने म्हटलंय.

“जर मला कोणी येऊन सांगितलं की श्रीशांत हा भावनिक माणूस आहे, तर मला ते मान्य आहे. एखाद्या खेळाडूने भावनिक असूच नये असं माझं म्हणणं नाही. पण तू या सामन्यात खेळणार नाहीयेस, हे सांगितल्यानंतर संघासमोर विक्षिप्तासारखं वागणं हे योग्य नाही. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक सामना खेळायला मिळणार नाही, याची कल्पना प्रत्येकी वेळी खेळाडूंना देण्यात येते. ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही त्यांना वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. मात्र या कारणासाठी श्रीशांतने सर्वांसमोर तमाशा घातला. कर्णधाराबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. याचाच अर्थ त्यावेळी नक्की काहीतरी शिजत होतं.” अपटन यांनी त्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला.

यापुढे बोलत असताना अपटन म्हणाले, मुंबईविरुद्ध सामन्यात आम्ही श्रीशांत आणि चंदेला या दोन्ही खेळाडूंना संघाबाहेर बसवलं. मात्र आपली फिक्सींगची कामगिरी पूर्ण करण्यासाठी दोघांनीही त्यावेळी एका तिसऱ्या खेळाडूला गाठलं. तो खेळाडू अंकित चव्हाण होता. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये, अजित चंदेला आपल्याशी संपर्कात असलेल्या बुकीला अंकित चव्हाण फिक्स झाल्याचं सांगत असल्याचा उल्लेख आहे. याच चार्जशीटमध्ये चंदेलाने चव्हाणला एका षटकात १२ किंवा त्यापेक्षा जास्त धावा देण्यासाठी सांगितलं होतं. याप्रमाणे चंदेलाने एका षटकात १५ धावा दिल्या.

या प्रकरणात तिन्ही खेळाडूंवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. यापैकी श्रीशांतवर लादण्यात आलेली बंदी उठवण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला विनंती केली आहे. श्रीशांतने मात्र अपटन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आतापर्यंत आपण ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो त्या सर्वांचा मी आदर केल्याचंही श्रीशांतने म्हटलं आहे.