मॅच फिक्सिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या एस श्रीशांतला केरळ हायकोर्टाने दिलासा दिलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याच्यावर घातलेली आजीवन बंदी हायकोर्टाने सोमवारी हटवली. मे २०१३ मध्ये दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणात श्रीशांतसह राजस्थान रॉयल्सच्या अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना अटक केली. हा काळ श्रीशांतसाठी फारच कठीण होता. त्याच्यावरील आजीवन बंदी उठवली असली, तरी तो पुन्हा मैदानात दिसेल किंवा नाही हे सध्या सांगणे अशक्य आहे. पण दोषमुक्त झाल्यानंतर मैदानात उतरण्याची त्याची आशा मात्र पुन्हा पल्लवीत झाली आहे. केरळ क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी देखील श्रीशांतला पुन्हा मैदानात उतरवण्याच्या संधीबद्दल सकारात्मकता दाखवली. आजच्या घडीला श्रीशांत आनंदी असला तरी आरोपानंतरचा त्याचा प्रवास फारच खडतर असा होता. यावेळी पत्नी आणि कुटुंबियांनी त्याला सावरले.

तिहार कारागृहामध्ये असताना आत्महत्या करण्याचा विचार मनात घोळत होता, असे खुद्द फिक्‍सिंगच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतर श्रीशांतने सांगितले होते. यातून पत्नीने दिलेल्या आत्मविश्वासामुळेच मी बाहेर पडू शकलो, असेही तो म्हणाला. मी सर्वांत आधी क्रिकेटपटू आहे आणि मला पुन्हा क्रिकेट खेळायचे आहे, असेही त्याने यावेळी सांगितले. दोन वर्षांपूर्वीचे त्याचे शब्द आजही बदलले नाहीत. अजून ६ ते ७ वर्षे मैदानात खेळू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केलाय.

२०१३ मध्ये रंगलेल्या आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात फिक्सिंगप्रकरणात श्रीशांतचे नाव जोडले गेले. १६ मेला श्रीशांतसह तिघांना अटक झाली. हा आरोप असतानाच १२ डिसेबरला श्रीशांतने प्रेयसी भुवनेश्वर कुमारीसोबत विवाह केला. श्रीशांतची पत्नी त्याच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. दोघे एकमेकांना ६ वर्षांपासून ओळखत होते. फिक्सिंगच्या आरोपानंतर श्रीशांतचे सर्व संपुष्टात आले असतानाही भुवनेश्वरीने त्याची साथ सोडली नाही. विशेष म्हणजे ज्यावेळी श्रीशांत तरुंगात होता, त्यावेळी एकदाही भुवनेश्वरी त्याला भेटण्यासाठी तुरुंगात गेली नाही.