पाकिस्तानविरुद्धचा डर्बन येथे झालेला दुसरा एकदिवसीय सामना आफ्रिकेने ५ गडी राखून सहज जिंकला. २०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अवस्था ५ बाद ८० अशी झाली होती. पण त्यानंतर वॅन डर डसन आणि अँडील फेलूकव्हायो या दोघांनी शेवटर्यंत लढा देत सामना जिंकवला. त्याच्या या चिवट खेळीमुळे कंटाळलेल्या पाकिस्तानच्या कर्णधाराने मैदानावर फेलूकव्हायोवर वर्णभेदी टीका केली. त्यावरून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने याने सर्फराजला चांगलेच सुनावले आहे.

या सामन्यात सहाव्या विकेटसाठी वॅन डर डसन आणि अँडील फेलूकव्हायो यांनी १२४ धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे वैतागून सर्फराज फेलूकव्हायोला म्हणाला, ”ए काळ्या, तुझ्या आईला तू कुठे बसवून आला आहेस? आईला काय प्रार्थना करायला सांगितली आहेस?”

त्याच्या या वक्तव्यावर शोएब अख्तरने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्याने स्पष्ट म्हटले आहे की सर्फराजने जे वक्तव्य केले आहे, ते अतिशय चुकीचे आहे. एक पाकिस्तानी म्हणून तर मला ते नक्कीच न पटणारे आहे. त्यामुळे सर्फराजने जाहीर माफी मागावी, असे त्याने म्हटले आहे.

याशिवाय, नेटिझन्सनेही सर्फराजचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्यावर बंदीची मागणी करण्यात येत आहे.

==

दरम्यान, याबाबत ICC किंवा त्या विशिष्ट सामन्याचे सामनाधिकारी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.