भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या साबा करीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सीईओ राहुल जोहरी यांच्यानंतर राजीनामा देणारे करीम हे दुसरे मोठे अधिकारी ठरले आहेत. करीम यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरीही यापुढील काळात बीसीसीआय नवीन अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर करीम यांची गच्छंती निश्चित मानली जात होती.

भारतीय स्थानिक क्रिकेटचं आयोजन सुरळीत पार पडलं जावं ही जबाबदारी करीम यांच्या खांद्यावर होती. जानेवारी २०१८ मध्ये करीम यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं संचालकपद राहुल द्रविडसारख्या अनुभवी खेळाडूकडे देण्यात यावं ही कल्पनाही करीम यांचीच होती. मात्र करीम यांच्या कार्यपद्धतीवर बीसीसीआयमधील काही अधिकारी नाराज होते. त्यानंतर करीम यांनी आपला राजीनामा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्याकडे पाठवला आहे.

करीम यांचा राजीनामा मिळाल्याच्या वृत्ताला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला. पुढील काही काळ करीम नोटीस पिरेडवर काम करतील, त्यादरम्यान बीसीसीआय नवीन जनरल मॅनेजर पदासाठी व्यक्तीची निवड करेल अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली. ३४ वन-डे आणि एका कसोटी सामन्यात करीम यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये करीम यांनी बिहार आणि बंगालचं प्रतिनिधीत्व केलं आहे.