14 December 2017

News Flash

मुंबईसाठी महत्त्वाच्या रणजी सामन्यात सचिन अनुपलब्ध

रविवारी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर करणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर रणजी साखळी गटामधील

क्रीडा प्रतिनिधी मुंबई | Updated: December 27, 2012 3:49 AM

बाद फेरीच्या सामन्यांसाठी सचिन उपलब्ध
शुक्रवारपासून गुजरातविरुद्ध रणजी साखळीमधील अखेरचा सामना
इक्बाल अब्दुल्लाऐवजी धवल कुलकर्णीचा मुंबईच्या संघात समावेश
रविवारी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर करणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर रणजी साखळी गटामधील मुंबईच्या अखेरच्या सामन्यात खेळणार नाही. परंतु ३९वेळा रणजी करंडक विजेता मुंबईचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी वाटचाल करीत आहे. सचिनने आपण बाद फेरीसाठी उपलब्ध असल्याचे कळविले आहे.
‘‘मी सचिनला गुजरातविरुद्धच्या अखेरच्या रणजी सामन्यात खेळणार का, यासंदर्भात विचारले होते. सुटीवर असल्यामुळे आपण खेळू शकणार नसल्याचे सचिनने स्पष्ट केले होते. परंतु बाद फेरीच्या सामन्यांसाठी आपण मुंबईसाठी उपलब्ध आहोत, हे मात्र त्याने आवर्जून सांगितले होते,’’ अशी माहिती मुंबई क्रिकेट असोएिशनचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
गेल्या महिन्यात रणजी हंगामाचा प्रारंभ मुंबईने रेल्वेविरुद्धच्या सामन्याने केला. त्या सामन्यात सचिनने खेळून शानदार शतकही झळकावले होते. सध्या रणजी क्रिकेट स्पध्रेच्या अ गटात गुजरातचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या गुजरातविरुद्धच्या अखेरच्या रणजी सामन्यात मुंबईने सलग दुसऱ्या निर्णायक विजयाचा निर्धार केला आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने मंगळवारी कमाल केली. इंदूरला मध्य प्रदेशविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत मुंबईने विजय मिळवत सहा गुणांची कमाई करीत आशा पल्लवित केल्या.
अ गटाच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ मध्य प्रदेशसहित २० गुणांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. अ गटातून अव्वल तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे मुंबईला गुजरातविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर किमान तीन गुणांची कमाई करणे आवश्यक आहे. पंजाबच्या संघाने सर्वाधिक ३२ गुणांसह आपले स्थान पक्के केले आहे. आता उर्वरित दोन स्थानांकरिता पाच संघांमध्ये अखेरच्या फेरीत चुरस असेल. दरम्यान,संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईच्या निवड समितीने इक्बाल अब्दुल्लाला विश्रांती दिली आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्याला मुकणाऱ्या वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा त्याच्या जागी संघात समावेश करण्यात आला आहे.
मुंबईचा संघ : अजित आगरकर (कर्णधार), कौस्तुभ पवार, वसिम जाफर, हिकेन शाह, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, आदित्य तरे (यष्टीरक्षक), अंकित चव्हाण, धवल कुलकर्णी, झहीर खान, जावेद खान, शार्दुल ठाकूर, शोएब शेख, निखिल पाटील (ज्यु.), विशाल दाभोळकर.

First Published on December 27, 2012 3:49 am

Web Title: sachin absent in important match for mumbai