आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीने काही वर्षांपूर्वी DRS ची सुविधा निर्माण केली. मैदानावरील पंचांचा एखादा निर्णय जर खेळाडूंना पटला नसेल तर त्याच्याविरोधात DRS च्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे अपिल करण्याची मुभा खेळाडूंना मिळते. अनेकदा तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर शंका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पायचीतचं अपील Umpire’s Call मुळे फेटाळलं गेलं. यामुळे भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने आयसीसीला DRS च्या प्रणालीत सुधारणा करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतल्यानंतर…दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्स उमेश यादवच्या गोलंदाजीवर ४ धावा काढून माघारी परतला. यानंतर मॅथ्यू वेड आणि मार्नस लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लाबुशेन मैदानावर स्थिरावतोय असं वाटत असतानाच आश्विनने त्याला कर्णधार रहाणेकरवी झेलबाद करत कांगारुंना दुसरा धक्का दिला. लाबुशेनने २८ धावा केल्या. यानंतर वेड आणि स्मिथ यांनी उरलेली षटकं खेळून काढत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही.