सातत्याने होत असलेल्या खराब कामगिरीमुळे सचिन तेंडुलकरवर होणाऱ्या टीकेत वाढ होत असली तरी भारतीय संघाला सचिनची खरी गरज आता आहे. उर्वरित मालिकेत सचिनकडून चांगली कामगिरी होण्यासाठी त्याला पाठिंबा द्यायला हवा, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत सचिनने चाहत्यांची घोर निराशा केली. मुंबईतील दुसरी कसोटी १० विकेट्स राखून जिंकत इंग्लंडने चार सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कसोटीतील गेल्या दहा डावांत सचिनला अर्धशतकही झळकावता आले नाही. इंग्लंडविरुद्ध तीन डावांत सचिनला फक्त २९ धावाच करता आल्या. ‘‘भारताला सचिनची आता खरी गरज जाणवणार आहे. मालिका १-१ अशा बरोबरीत असताना संघातील अनुभवी खेळाडूंनी आता कामगिरी उंचावण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सचिनच भारतीय संघासाठी तारणहार ठरू शकतो. या मालिकेत त्याला नशिबाची साथ लाभलेली नाही. अहमदाबाद कसोटीत पाटा खेळपट्टीवर अन्य फलंदाज चांगल्या धावा जमवत असताना सचिन चांगले फटके खेळताना बाद झाला. आपण खेळलेल्या फटक्यांवर बाद झाल्यानंतर सचिनने नाराजीही व्यक्त केली. मुंबईत पहिल्याच दिवशी चेंडू जास्त वळत होता. त्याच वेळी सचिन मॉन्टी पनेसारची शिकार ठरला,’’ असेही द्रविडने सांगितले.
सचिनच्या खराब फॉर्ममुळे संघातील त्याचे स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. आपल्या भवितव्याविषयी सचिनने निवड समितीशी चर्चा करावी, अशी विनंती माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केली असली तरी भारतीय संघाला सचिनची नितांत गरज आहे, असे द्रविडला वाटते. द्रविड म्हणाला, ‘‘न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील गेल्या मालिकेपेक्षा इंग्लंडविरुद्ध सचिनची तयारी चांगली झाली आहे. तो चांगले फटकेही खेळत आहे. मात्र तरीही तीन डावांत तो अपयशी कसा ठरला, हेच मला कळत नाही.’’
कोलकाता येथे ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजीतील पर्यायांचा विचार करावा, असे द्रविडला वाटते. ‘‘युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग हे कामचलाऊ फिरकी गोलंदाज संघात असतानाही तीन फिरकीपटू खेळवण्याचा पुनर्विचार धोनीला करावा लागेल. दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज ही अहमदाबाद कसोटीसाठी गोलंदाजांची निवड अप्रतिम होती. कोलकाताची खेळपट्टी ही उपखंडातील खेळपट्टय़ांप्रमाणेच असेल, अशी आशा आहे. त्यामुळे या सामन्यासाठी दोन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाज खेळवण्याबरच धोनीने भर द्यावा. कोलकातात भारताने सुरेख कामगिरी केली आहे. त्यामुळे येथे भारत पुनरागमन करेल, अशी आशा आहे.’’
दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज उमेश यादव कोलकाता कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अशोक दिंडा याला संधी देण्यात आली आहे. मुंबई कसोटीत बरीच षटके टाकूनही हरभजन सिंगला अपेक्षित यश न मिळाल्याने कोलकाता कसोटीत हरभजनला स्थान देऊन तिसरा फिरकीपटू खेळवण्याऐवजी दिंडाला संधी मिळण्याची शक्यता आहे.