वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत सचिन शतक झळकावतो की नाही हे गौण असल्याचे भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने म्हटले आहे. २४ वर्षांच्या प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीसाठी त्याला शानदार पद्धतीने अलविदा करणे महत्त्वाचे असल्याचे राहुलने पुढे सांगितले. पुढील महिन्यात १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईत होणाऱ्या कसोटीनंतर सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार
आहे.
शेवटच्या दोन सामन्यांचा त्याने मनमुराद आनंद लुटावा. त्याचे शतक होणार की नाही या गोष्टी अजिबातच महत्त्वाच्या नाहीत. या दोन सामन्यांमध्ये त्याने क्रिकेटचा समरसून आस्वाद घ्यावा. हे दोन सामने ऐतिहासिक क्षण असणार आहे. या मालिकेसाठी माझ्याकडून त्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि २४ वर्ष अव्याहत भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानायचे आहेत.
सचिन एक असा खेळाडू आहे ज्याने खेळाचा दर्जा कधीही घसरू दिला नाही. सोळाव्या वर्षांपासून ते अगदी आतापर्यंत क्रिकेटविषयीचे त्याच्या प्रेमात सातत्य आहे. शेवटच्या दोन कसोटी सामन्यांत त्याने चांगली कामगिरी करून निरोप घ्यावा अशी इच्छा आहे. त्याचे कुटुंबीय या सामन्यांसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा एक मोठा क्षण असणार आहे. प्रदीर्घ कारगीर्दीगीसाठी त्याने अपार मेहनत घेतली आहे, त्यामुळे सन्मानपूर्वक आणि दिमाखदार निरोपाचा तो हकदार आहे असे द्रविडने सांगितले.
त्याच्याबद्दल सर्व काही लोकांना माहिती आहे. सर्वाधिक लिहिले गेलेला तो एकमेव क्रिकेटपटू असावा. त्याने मिळवलेल्या यशाला आणि विक्रमांना गवसणी घालणे अतिशय कठीण आहे. मी सचिनसोबत खुप क्रिकेट खेळलो आहे. लहानपणापासून त्याला पाहतो आहे. त्याने केलेले पराक्रम मोडणे खरंच खुप कठीण आहे.
सचिनची जागा कोण घेऊ शकले असे विचारले असता द्रविड म्हणाला, कुठल्याही युवा खेळाडूकडून तात्काळ अशी अपेक्षा करणे कठीण आहे. अनेक युवा गुणवान खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. विराट कोहली सातत्यपूर्ण प्रदर्शन करत आहे. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना हे सगळेच चांगली कामगिरी करत आहेत. यांच्यापैकी कोण भारतीय कसोटी संघात कायमस्वरूपी स्थान मिळवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.