भारतीय क्रिकेटची दीर्घकालीन सेवा करणारे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या महान खेळाडूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नव्याने स्थापन केलेल्या सल्लागार समितीमध्ये समावेश केला आहे. बीसीसीआय आणि भारतीय संघाची उन्नती व्हावी, यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
‘‘बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची नियुक्ती सल्लागार समितीवर केली आहे. ही समिती लगेचच आपल्या कामाला लागणार आहे. या तिन्ही महान क्रिकेटपटूंनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. यापुढील प्रगतिशील गोष्टींसाठी ही समिती बीसीसीआयला मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे समस्या निवारणाचे काम ही समिती करील,’’ असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
ही समिती मुख्यत्वेकरून खेळाशी आणि संघाशी निगडित गोष्टींवर सल्ले देणार आहे. परदेशातील दौऱ्यांमध्ये भारतीय संघाला काही अडचणींचा सामना करावा लागतो, या दौऱ्यांतील साऱ्या समस्यांचे निवारण ही समिती करणार आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेट अधिक सक्षम करण्यासाठी ही समिती प्रयत्नशील असेल.
भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी हे तिघेही महान फलंदाज नक्कीच चांगले काम करतील, असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष दालमिया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,
‘‘आपल्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला व्हावा आणि संघाने अजून मोठी भरारी घ्यावी, यासाठी हे तिन्ही महान खेळाडू पुढे आले असून त्यांचा संघाला नक्कीच फायदा होईल.
सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा केल्या होत्या, तर ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला १८४२६ धावा फटकावल्या होत्या. गांगुलीने ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. लक्ष्मण भारतासाठी १३४ कसोटी आणि८६ एकदिवसीय सामने खेळला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सल्लागार समिती संघाला तांत्रिक सल्ला देणार आहे. महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी सचिन संघाला मार्गदर्शन करणार आहे. गांगुलीकडे संघाची व्यूहरचना आखण्याचे काम देण्यात येणार आहे, तर लक्ष्मण उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. भारतीय संघ ७ जूनपासून बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यापासून सल्लागार समितीचे काम सुरू होणार आहे.

सल्लागार समिती काय करणार?
गेल्या काही वर्षांमध्ये भारताला विदेशात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विदेशी दौऱ्यामध्ये ही सल्लागार समिती संघाला मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर स्थानिक क्रिकेटचा विकास व्हावा, यासाठी ही समिती प्रयत्नशील असेल. त्याचबरोबर खेळाडूंना तांत्रिक सल्लाही ही समिती देणार आहे.

समितीतील सदस्यांची भूमिका
सचिन तेंडुलकर : महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाला समुपदेशन करण्याचे मुख्य काम सचिनकडे असेल. सचिनने कारकीर्दीच्या उतरत्या काळात संघासाठी अनौपचारिकपणे मार्गदर्शकाची भूमिका वठवली होती आणि त्याचा संघाला फायदा झाला होता.
सौरव गांगुली : संघाची व्यूहरचना आखण्याचे मुख्य काम सौरवकडे सोपवण्यात आले आहे. सौरवने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवताना बरेच प्रयोग करत चांगली रणनीती आखली होती. आणि त्याचा संघाला चांगला फायदा झाला होता.
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण : संघातील राखीव आणि उदयोन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी लक्ष्मणवर सोपवण्यात आली आहे. हे खेळाडू खेळत नसताना त्यांनी बलस्थान आणि कच्च्या दुव्यांवर काय मेहनत घ्यावी, ही जबाबदारी त्याच्याकडे असेल.