24 November 2017

News Flash

सचिन आला धावून, पण..

विश्वविक्रमांच्या बादशाहचा धावांचा प्रवाह अजून आटलेला नाही.. मास्टर-ब्लास्टर संपलेला नाही.. ३९व्या वर्षीसुद्धा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर

प्रशांत केणी, मुंबई | Updated: February 9, 2013 4:27 AM

* सचिनच्या झुंजार शतकाने मुंबईला सावरले
* शेष भारताकडे १४४ धावांची आघाडी

विश्वविक्रमांच्या बादशाहचा धावांचा प्रवाह अजून आटलेला नाही.. मास्टर-ब्लास्टर संपलेला नाही.. ३९व्या वर्षीसुद्धा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर लीलया हुकमत गाजवू शकतो.. नेमके हेच सचिन तेंडुलकरने इराणी करंडक सामन्यात संस्मरणीय शतक झळकावून दाखवून दिले. ‘सचिन संपलाय, त्याने निवृत्ती पत्करावी’ असे सल्ले देणाऱ्या टीकाकारांना आपल्या शानदार खेळीनिशी या महान फलंदाजाने चोख उत्तर दिले. ऑस्ट्रेलिया दौरा दोन आठवडय़ांवर आला असताना सचिनने मुंबईला सावरणारी महत्त्वाकांक्षी खेळी करीत कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज आहोत, असा इशाराच एक प्रकारे दिला आहे. शुक्रवारी वानखेडे स्टेडियमच्या साक्षीने सचिनने सुनील गावस्कर यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ८१ शतकांच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी करीत आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. पण सचिनचे हे शतक मुंबईला तारणारे ठरेल का, या प्रश्नाचे उत्तर मात्र उर्वरित दोन दिवसांत मिळेल. पण सामना अनिर्णीत राहिल्यास पहिल्या डावातील पिछाडीमुळे इराणी करंडकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी मात्र मुंबईने दवडली आहे.
शेष भारताच्या ५२६ धावसंख्येपुढे मुंबईने सचिनच्या शतकामुळे तिसऱ्या दिवशी ४०९ धावांचे उत्तर दिले. त्यानंतर उत्तरार्धातील खेळात शिखर धवन भोपळा फोडण्याआधीच माघारी परतल्यामुळे शेष भारताची १ बाद २७ अशी दैना उडाली असली तरी त्यांची एकंदर आघाडी १४४पर्यंत वाढल्यामुळे मुंबईला इराणी करंडकाचे स्वप्न साकारणे अवघड जाणार आहे. परंतु तिसऱ्या दिवसानंतर वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर गोलंदाज राज्य करतात, हा पूर्वलौकिक पाहता अजून मुंबईच्या हातातून सामना निसटलेला नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
शुक्रवारी सकाळी पहिल्याच चेंडूवर नाइट वॉचमन शार्दुल ठाकूर पहिल्याच चेंडूवर तंबूत परतल्यानंतर सचिनने अजिंक्य रहाणेच्या साथीने मुंबईचा किल्ला लढविला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली, तेव्हा मुंबईचा संघ निर्धास्त होता. परंतु शतकाकडे कूच करणारा अिजक्य ८३ धावांवर (९ चौकार आणि १ षटकार) हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर दुर्दैवीरीत्या पायचीत झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि अभिषेक नायर या धडाकेबाज फलंदाजांनी निराशा केली आणि मुंबईची ६ बाद २५७ अशी अवस्था झाली. पण सचिनचा इरादा पक्का होता. त्याने मग अंकित चव्हाणसोबत सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली आणि मुंबईला सावरण्याचे कसोशीने प्रयत्न केले. अर्धशतकापासून एका धावेच्या अंतरावर असताना अभिमन्यू मिथुनने अंकितला बाद करून ही जोडी फोडली. मग हरभजन आणि ओझा या शेष भारताच्या फिरकी माऱ्याने मुंबईचे शेपूट सहज गुंडाळले.
सचिनने ३४३ मिनिटे मैदानावर एकाकी झुंज देत १९७ चेंडूंत १८ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १४० धावांची खेळी उभारली. सचिन यंदाच्या स्थानिक हंगामात चौथ्यांदा मुंबईचे प्रतिनिधित्व करताना तिसऱ्या शतकाची अदाकारी मुंबईकरांना पेश केली.
संक्षिप्त धावफलक
शेष भारत (पहिला डाव) : ५२६
मुंबई (पहिला डाव) : ११४.१ षटकांत सर्व बाद ४०९ (वासिम जाफर ८०, अजिंक्य रहाणे ८३, सचिन तेंडुलकर नाबाद १४०, अंकित चव्हाण ४९; हरभजन सिंग ३/६४)
शेष भारत (दुसरा डाव) : ५ षटकांत १ बाद २७ (मुरली विजय खेळत आहे १८).

First Published on February 9, 2013 4:27 am

Web Title: sachin had came but