सचिन रमेश तेंडुलकर ही अकरा अक्षरे प्रतिस्पध्र्याना ११ खेळाडूंसारखी वाटतात.. अनेकांच्या गळ्यातील ताईत, खऱ्या अर्थाने सेलिब्रेटी अन् खेळाचा राजदूत.. अनेक मैलांचे दगड त्याने सहजरीत्या गाठले, त्यामुळेच कोणत्याही देशाचे लोक त्याला आपले मानतात, त्यांना तो आपल्यांमधला वाटतो आणि त्यामुळेच त्याच्यावर नेहमीच स्तुतीसुमनांचा वर्षांव होत असतो, त्यामध्येच आता भर पडली आहे ती ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनची. ‘‘सचिन हा भारताचा डॉन ब्रॅडमन आहे. सचिन स्वत:मध्येच एक चळवळ आहे,’’ असे वक्तव्य हेडनने केले आहे.
येत्या काही वर्षांत सचिनवर पुस्तके निघतील, त्याच्यावर सिनेमेही होतील, कारण या सर्वाच्या लायक नक्कीच तो आहे. कारण त्याने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर, स्तरावर नेऊन ठेवले आहे. भारतातील आणि परदेशातील विजयांमध्ये त्याचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. तो आतापर्यंत भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे, देशाचा डॉन ब्रॅडमन, असे हेडन पुढे म्हणाला.
काही दिवसांमध्ये सचिनचा ४०वा वाढदिवस आहे, त्यासाठी एका खासगी मासिकाने सचिनबद्दलच्या भावना सर्व स्तरांतल्या मान्यवर व्यक्तींकडून जाणून घेतल्या.
हेडन यामध्ये पुढे म्हणाला की, माझ्या आतापर्यंतच्या महान क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन नेहमीच अव्वल स्थानावर असेल, हे फक्त क्रिकेटमुळे नाही, तर तो एक अभिव्यक्ती म्हणूनही फार मोठा आहे. सचिन ही स्वत:मध्येच एक चळवळ आहे. वर्षांनुवर्षे त्याची कामगिरी बरेच जण पाहात आले आहेत, त्याच्या कामगिरीचा अभ्यासही काही जणांनी केला आहे. त्याच्या आयुष्यात काही वाईट तर काही चांगल्या गोष्टी घडल्या, पण याउपर खरे सागांयचे झाले तर सचिन हा सार्वकालिक महान खेळाडू आहे.
तो पुढे म्हणाला की, सचिन फक्त क्रिकेटपटू म्हणून महान नाही तर एक व्यक्ती म्हणूनही तेवढाच महान आहे. सचिन एक देश आहे, तो एक घर आहे, एक आशा, एक संस्कृती आहे सचिन.
सचिनच्या पाहिलेल्या सर्वोत्तम खेळीबद्दल हेडन म्हणाला की, सचिनने सिडनीमध्ये झळकावलेले द्विशतक ही त्याची मी पाहिलेली सर्वोत्तम खेळी मला वाटते. त्याच्या या खेळी एक शिस्त होती, तो खेळतोय असे वाटतच नव्हते. त्याच्या फटक्यांमध्ये दिलखेचक नजाकत होती. शेन वॉर्नसारख्या फिरकीच्या बादशहाचा त्याने अप्रतिमपणे सामना केला होता. सचिनबद्दल हेडन पुढे म्हणाला की, कोटय़वधी चाहत्यांच्या त्याच्याकडून फार मोठय़ा आशा, अपेक्षा, आकांक्षा असतात. त्यामुळे या दडपणाखाली खेळणे नक्कीच सोपे नाही, या दडपणाचा आपण विचारही करू  शकत नाही आणि गेले दोन दशके तो हे सारे दडपण घेऊन देदीप्यमान कामगिरी करीत विश्वविक्रमांचे एव्हरेस्ट सर करत आहे.
मास्टर, ब्लास्टर भेटतात तेव्हा..
नवी दिल्ली :  सचिन तेंडुलकर आणि सर विव्ह रिचर्ड्स ही क्रिकेटमधली दोन चिरंतन नावं.. काळ कुठलाही असो, दोघे खेळत असो किंवा नसो, जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत या दोन नावांना क्रिकेटपटू विसरूनही विसरू शकत नाही. दोघांचे खेळण्याचे काळ वेगळे, पण दरारा मात्र सिंहासारखाच.. रिचर्ड्स हे फलंदाजीला आल्यावर गोलंदाजांची फे फे उडायची, कारण कुठलाही चेंडू सीमापार टोलवण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, क्रिकेटमधले ‘ओरिजनल’ ब्लास्टर. तर सचिनबाबत किती बोलावं तेवढंच थोडं आहे, या मास्टरने क्रिकेटला एक वेगळी दिशा नक्कीच दिली आहे. आयपीएलच्या सामन्याच्या निमित्ताने हे ब्लास्टर आणि मास्टर भेटले आणि हा सुवर्णयोग पाहण्याची पर्वणी दिल्लीकरांना मिळाली. सामन्याच्या निमित्ताने सचिन फिरोजशाह कोटलावर सराव करत होता, तर रिचर्ड्स यांना दिल्लीच्या संघाचे सल्लागारपद देण्यात आल्यामुळे त्यांची भेट झाली.
 सचिनला पाहिल्यावर रिचर्ड्स यांनी त्याला मिठी मारली. त्यानंतर रिचर्ड्स यांनी सचिनला त्याचे पोट दाखवले आणि दोघांमध्ये चांगलाच हशा पिकला. चाळिसाव्या वर्षांत पदार्पण करत असतानाही पोट पुढे आलेले नाही, हे रिचर्ड्स यांनी सचिनला सांगितले असावे. त्यानंतर रिचर्ड्स यांनी सचिनची बॅट हातात घेतली आणि त्यांच्यामध्ये १० मिनिटे चर्चा झाली.