धीरगंभीर भावमुद्रेतील सचिन.. सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी झालेली सचिनची भेट..चेंडूला भिरकावून देणारा सचिन.. बालपणीचा अत्यंत कुरळ्या केसातील कृष्णधवल सचिन.. यांसह ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरच्या जीवनातील महत्वपूर्ण टप्पे एकाच कॅनव्हॉसवर पाहायला मिळाले तर. नवी दिल्लीत सचिनला ‘भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर नाशिकमधील आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रा. प्रफुल्ल सावंत यांनी सचिन तेंडुलकरचा जणूकाही जीवनपटच तीन फूट बाय पाच फूटाच्या कॅनव्हॉसवर रेखाटला आहे. ‘मॅग्निफिसेंट व्होएज ऑफ सचिन’ या शीर्षकाचे हे चित्र महिन्याभरात सचिनच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. प्रफुल्ल सावंत यांचे बंधू प्रा. राजेश सावंत यांनी दिली.
प्रफुल्ल सावंत यांनी साकारलले हे तैलचित्र म्हणजे अनेक लहान-मोठय़ा चित्रांचा समूहच म्हणावा लागेल. त्यात सचिनला मिळणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची प्रतिकृती लक्ष वेधून घेते. सचिनचे आयुष्यच आश्चर्यकारक असल्याने त्याचे प्रतीक म्हणून आणि तो मुंबईचा असल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस दाखवण्यात आले आहे. याशिवाय सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर, वडील रमेश तेंडुलकर, आई रजनी, पत्नी अंजली यांच्या भावमुद्राही या चित्रात आहेत. सचिनच्या दृष्टीने सर डॉन ब्रॅडमन यांची भेट अनमोल. त्या भेटीला या चित्रात स्थान देतानाच ताजमहालप्रमाणेच सचिनची कीर्ती सर्वत्र फैलावल्याचे दर्शविण्यात आले आहे.
‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी हा चित्ररूपी जीवनपट सचिनला भेट देण्याची प्रा. सावंत यांची इच्छा होती. परंतु या पुरस्काराचा सन्मान आणि सुरक्षितता या कारणास्तव ते अशक्य असल्याने महिनाभरात हे चित्र सचिनला देण्यात येईल, असे प्रा. सावंत यांनी नमूद केले.