सचिन तेंडुलकर हा सार्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे तर विराट कोहली हा आताच्या पिढीतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे, असे कौतुकोद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने काढले आहेत.

‘‘तंत्राच्या बाबतीत सचिन तेंडुलकर हा मी पाहिलेल्यांमध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्यासारख्या फलंदाजाला बाद करणे नेहमीच कठीण असते. सचिनच्या फलंदाजीत उणिवा शोधूनही सापडणार नाहीत. सध्या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे. त्याची आकडेवारी विलक्षण आहे.,’’ अशा शब्दांत क्लार्कने सचिन आणि कोहलीचे कौतुक केले आहे.

सचिनकडून ५००० गरजूंना मदत

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने करोनाविरुद्धच्या लढाईत गरजूंना मदत केली आहे. सचिन याने ‘अपनालय’ संस्थेसाठी एका महिन्याकरिता ५००० जणांना अन्न देणार असल्याचे जाहीर केले आहे. सचिन याने याआधी ५० लाख रुपयांची मदत केली होती.