ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सचिन तेंडुलकर पुन्हा अपयशी ठरल्यास, क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती पत्करण्याचे दडपण त्याच्यावर येऊ शकते. पण अपयशामुळे सचिनने खचून जाऊ नये, हीच तमाम चाहत्यांची इच्छा आहे, असे सांगत इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांनी सचिनची पाठराखण केली आहे.
‘‘मार्च महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेत धावा काढण्यासाठी सचिन उत्सुक असेल. मात्र सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे सचिनने स्वत:वर कोणतेही दडपण घेऊ नये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी करण्यात सचिन अपयशी ठरल्यास, तो स्वत:हून आपली निवृत्ती जाहीर करेल, अशी आशा आहे. पण त्याच्यावर धावा काढण्यासाठी दडपण आणू नये,’’ असेही त्याने सांगितले.
आपल्या २३ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या सचिनने रविवारी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. याविषयी बॉयकॉट म्हणाले, ‘‘सचिनचा हा निर्णय व्यावहारिक आणि योग्य म्हणावा लागेल. ज्या गोष्टीसाठी आपण सरावलो आहोत, वाढत्या वयानुसार ती गोष्ट आपल्याकडून होत नाही, हे सत्य स्वीकारणे नेहमीच जड जाते. वाढते वय लक्षात घेऊनच संवेदनक्षम असलेल्या सचिनने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. भारताला कसोटीत सचिनची अधिक गरज आहे, असे मला वाटत नाही. याचा निर्णय भारताने घ्यायला हवा. सचिनने आपल्या कारकीर्दीत स्वत:साठी आणि देशासाठी बरेच काही केले आहे. सचिन फक्त आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.’’
‘‘सचिन भारतासाठी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळाडूच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. पण सचिन हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता, असे कुणीही म्हणणार नाही. वाढत्या वयातही तो जलद गतीने धाव काढायचा. पण त्याने हवेत झेप घेऊन झेल पकडण्याचा किंवा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केल्याचे फारसे आठवत नाही. वाढत्या वयानुसार नीट झेप घेता येत नाही, त्यामुळे पडल्यावर दुखापती होण्याचा धोका अधिक असतो. राष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळून सचिनने स्वत:ला तंदुरुस्त राखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे,’’ असेही बॉयकॉट म्हणाले.