मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर १९८९ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली होती. कराचीतील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सचिन १६ वर्षे २०५ दिवसांचा होता. ज्यावेळी सचिन मैदानात आला, त्यावेळी पाकिस्तानी कर्णधार इमरान खान कारकिर्दीतील पहिला सामना खेळणाऱ्या वकार युनूसला म्हणाले होते की, या मुलाविषयी खूप ऐकले आहे. तो चांगला खेळतो. त्यामुळे त्याला जास्त काळ खेळू द्यायचं नाही.

वकार युनूसचा देखील हा पहिलाच सामना होता. कर्णधाराचा सल्ला पाळत त्याने एका अप्रतिम स्विंगवर सचिनला क्लिन बोल्ड केले. आपल्या पहिल्या सामन्यात सचिन २४ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने अवघ्या १५ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर त्याने तब्बल २४ वर्षे मैदान गाजवले. पाकिस्तानी गोलंदाजांचा त्यांच्या घरच्या मैदानावर सामना करणे फारच कठीण होते. पण, आपल्या छोट्याशा डावात सचिनने भारतीय क्रिकेटला अच्छे दिन आल्याचे संकेत दिले होते.

दोन दशकं क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने वेस्ट इंडिजविरुद्ध २०० व्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेटला अलविदा केले. विशेष म्हणजे १५ नोव्हेंबरला कसोटी क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण केलेल्या सचिनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत १५ नोव्हेंबरलाच अखेरची इनिंग खेळली होती. यात त्याने ७४ धावांची खेळी केली होती. १४ नोव्हेंबर २०१३ ला वानखेडेच्या मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावानंतर सचिनने दुसऱ्या दिवशी अर्धशतकी खेळी केली होती. भारताने हा सामना एक डाव आणि १२६ धावांनी जिंकला होता.