भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला करोनाची लागण झाल्यावर सहा दिवसांनी सावधगिरीची उपाययोजना म्हणून शुक्रवारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ४७ वर्षीय सचिनने ‘ट्विटर’द्वारे हे स्पष्ट केले.

‘‘तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांबद्दल मी आभार आहे. सावधगिरीची उपाययोजना म्हणून वैद्यकीय सल्ल्यानुसार मला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांतच घरी परतेन अशी आशा आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,’’ असे सचिनने ‘ट्वीट’ केले आहे. रस्ते सुरक्षा जागतिक मालिका क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर २७ मार्चला सचिनला करोना झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून तो गृहविलगीकरणात होता.

‘‘सचिनची प्रकृती उत्तम असून, सर्वसाधारण उपचारासाठी त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे,’’ असे सचिनच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले.

२०११ मध्ये भारताच्या ऐतिहासिक विश्वविजेतेपदात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सचिनने दशकपूर्तीनिमित्त संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ‘‘विश्वविजेतेपदाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माझ्याकडून सर्व भारतीयांना आणि माझ्या संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा,’’ असेही सचिनने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.

रस्ते सुरक्षा जागतिक मालिका क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सचिनसह भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण, त्याचा मोठा भाऊ युसूफ, एस. बद्रिनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. रायपूरला झालेल्या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखालील भारतीय ज्येष्ठांच्या संघाने जेतेपद पटकावले होते.