भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्याने सध्या सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. पृथ्वी शॉ मध्ये भविष्यातील एक खेळाडू लपला आहे हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आधीच ओळखलं होतं. त्याने तसं आपल्या मित्रालाही बोलून दाखवलं होतं. पृथ्वी शॉ आठ वर्षांचा असतानाच सचिन तेंडुलकरने ही भविष्यवाणी केली होती. यावेळी त्याने पृथ्वी शॉला काही झालं तरी तुझा नैसर्गिक खेळ बदलू नको असा सल्लाही दिला होता.

सचिन तेंडुलकरने आपलं अॅप ‘100 एमबी’ वर सांगितलं की, ‘मी त्याला सांगितलं होतं की, भविष्यात प्रशिक्षकाने तुला ग्रिप किंवा स्टान्स बदलण्यास सांगितलं तर तसं करु नकोस. जर कोणी असं सांगत असेल तर त्याला माझ्याशी बोलायला सांग. प्रशिक्षण देणं चांगली गोष्ट आहे मात्र एखाद्या खेळाडूचा नैसर्गिक खेळ बदलू नये’.

‘तुम्ही जेव्हा एखाद्या अशा खेळाडूला पाहता तेव्हा त्याच्यात कोणतेही बदल न करणं महत्त्वाचं असतं. ही देवावकडून मिळालेली भेट असते’, असं सचिन तेंडुलकरने सांगितलं आहे. पृथ्वीची इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यासांठी भारतीय संघात निवड झाली आहे. पृथ्वी आठ वर्षांचा असतानाच आपण त्याच्यातील प्रतिभा ओळखल्याचा सचिनला आनंद आहे.

पृथ्वीला भेटल्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सचिनने सांगितलं की, ‘जवळपास 10 वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने मला पृथ्वीला खेळताना पाहण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या खेळाचं निरीक्षण करत त्याला काही सल्ला द्यावा असं त्याचं म्हणणं होतं. मी त्याच्यासोबत चर्चा करत खेळ सुधारण्यासाठी त्याला सल्ले दिले होते’.

पृथ्वीला पहिल्यांदा खेळताना पाहिल्यानंतर सचिनने आपल्या मित्राला सांगितलं होतं, ‘पाहतोयस का ? हा भविष्यातील भारतीय खेळाडू आहे’. पृथ्वीच्या नेतृत्वात भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 14 सामन्यांत सात शतकांच्या मदतीने 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत.