कतार येथे २०२२ मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरेल, अशी आशा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.
‘‘भारतीय फुटबॉलमध्ये येत्या काही वर्षांत क्रांती घडेल, अशी आशा आहे. त्यामुळे भारतीय संघ फिफा विश्वचषकात खेळेल, अशी आशा बाळगण्यात कोणतीच हरकत नाही. खेळाच्या प्रेमात पडल्यानंतर आपले लक्ष्य साध्य करता येते. मी आजही क्रिकेटच्या तितकाच प्रेमात पडलो आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घ्या, तुमचे स्वप्न नक्कीच साकार होईल,’’ असा सल्ला सचिनने युवा फुटबॉलपटूंना दिला. नवी मुंबईतील फादर आग्नेल शाळेच्या मैदानावर झालेल्या कोका-कोला चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी सचिन बोलत होता. मेघालयने ओरिसा संघावर १-० अशी मात करीत कोका-कोला चषकावर नाव कोरले. विजयी संघाकडून रोनाल्ड लिंगडोह याने निर्णायक गोल झळकावला.