क्रिकेटमुळे भारतात अन्य खेळांचे नुकसान झाले असा प्रचार करण्यात मी आघाडीवर असले, तरी सचिन तेंडुलकर याची मी चाहती आहे. का कोण जाणे त्याचा खेळ मला अतिशय आवडतो. क्रिकेटचा मी फारसा पाठपुरावा करीत नसले, तरी सचिन फलंदाजी करीत असला, की आवर्जून टेलिव्हिजनपासून दूर जात नाही.
माझ्यापेक्षा तो वयाने लहान असला तरी मीदेखील त्याच्यापासून स्फूर्ती घेत असते. आमच्यासारख्या धावपटूंसारखाच तो मैदानावर धावत असतो. विशेषत: सीमारेषेजवळ जाणारा चेंडू तो इतक्या सफाईने अडवतो की त्याची धाव नजरेत भरण्यासाठी असते. एखाद्या चित्त्याप्रमाणे तो धावत असतो. मी माझ्या शिष्यांना अनेक वेळा सचिनचे उदारहण देत असते. मैदानावर धावताना, फलंदाजी करताना त्याच्या खेळात दिसून येणारा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी या साऱ्या गोष्टी सचिनकडून शिकल्या पाहिजेत हे धडे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना देत असते. खेळाच्या कारकीर्दीत अडचणी आल्या तरी संयमाने या अडचणींवर कशी मात करता येते हे सचिनने अनेक वेळा दाखवून दिले आहे. तसेच तो विक्रमांसाठी कधीही खेळत नाही आणि आपला संघ अथवा देशाला तो कसा प्राधान्य देतो हेही त्याच्याकडून शिकले पाहिजे, असे मी नेहमी उदाहरण आमच्या अकादमीतील खेळाडूंना देत असते.
सचिन हा चाळिशीच्या उंबरठय़ावरील खेळाडू आहे असे कोणाला सांगूनदेखील पटणार नाही इतके सुरेख चापल्य त्याच्याकडे आहे. खेळात एकाग्रता ठेवली, की कीर्तीच्या शिखरावर पोहोचता येते आणि शिखरावरील हे स्थान टिकविणेही किती महत्त्वाचे असते, हेही सचिनच्या कारकीर्दीतून शिकावयास मिळते. सचिन जरी कर्णधाराच्या भूमिकेत नसला, तरी मैदानावर अन्य सहकारी सतत त्याची मदत घेत असतात. तो वरिष्ठ खेळाडू असला, तरी तो त्याच्या कर्णधाराचे आदेश मानतो हे मी जवळून पाहिले आहे. अतिशय विनम्र व संयमी खेळाडू म्हणून तो मला आवडतो.
सचिन हा लवकरच निवृत्त होत आहे असे वृत्त ऐकल्यानंतर मला थोडेसे दु:ख झाले. सचिनची जागा अन्य कोणी खेळाडू घेणार असला, तरी सचिनसारखी महानता व अव्वल दर्जाची शैली अन्य खेळाडूकडे येणार नाही. त्यामुळेच सचिनची उणीव मैदानावर निश्चित जाणवणार आहे. थोडासा विचार केला तर सचिनचा निवृत्तीचा निर्णय योग्यच आहे. कीर्तीच्या शिखरावर असतानाच निवृत्त होणे केव्हाही चांगले असते. त्याने अन्य युवा खेळाडूंकरिता आपली जागा रिकामी केली आहे, ही वस्तुस्थिती असली तरी त्याच्या जागी येणाऱ्या खेळाडूने आपण सचिनच्या जागी खेळत आहोत याची जाणीव ठेवीत खेळले पाहिजे.
स्पर्धात्मक खेळातून त्याने निवृत्ती घेतली असली, तरी आपल्या ज्ञानाचा फायदा अन्य युवा खेळाडूंना तो देईल, अशी मला खात्री आहे.