प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील प्रवास अद्वितीय वाटत असतो, त्यामुळे हा प्रवास, त्यामध्ये आलेले चढ-उतार, आयुष्यातला आनंददायी, क्लेशदायक, दु:खद, प्रेरणादायी घटनांचा कोलाज, आतापर्यंत k03सांगायच्या राहून गेलेल्या किंवा काही कारणास्तव सांगता न आलेल्या, काही गुप्त,  खासगी गोष्टींचा उलगडा करण्याचे एक माध्यम म्हणून आत्मचरित्राकडे पाहिले जाते. प्रत्येक क्षेत्रातल्या नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींना नक्कीच आत्मचरित्र लिहण्याचा मोह आवरता आलेला नाही. काही जणांना आपण किती महान आहोत, हे त्यामधून सांगायचे असते, तर काहींना आपला प्रवास इतरांना कळावा, आपण केलेल्या चुका त्यांच्याकडून होऊ नयेत, हादेखील या मागचा एक उद्देश असतो. सध्या भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र त्याच्याच फलंदाजीसारखे गाजते आहे. सचिनची फलंदाजी ही नेहमीच चांगल्या गोष्टींसाठी गाजली, पण त्याच्या आत्मचरित्राचे मात्र नक्कीच तसे नाही. हे आत्मचरित्र वाद-विवादांसाठी गाजताना दिसले. आतापर्यंत बऱ्याच क्रिकेटपटूंची आत्मचरित्रे प्रकाशित झाली, त्यामधील बरीच वादग्रस्त ठरली, तर काही प्रेरणादायी, तर काही थेट काळजाला हात घालणारी, तर काही बेधडक.
एका डावामध्ये सर्व म्हणजे १० बळी मिळवणारा इंग्लंडचा लेग-स्पिनर जिम लेकरने १९५१मध्ये ‘स्पिनिंग राऊंड दि वर्ल्ड’ हे आत्मचरित्र लिहिले. क्रिकेटपटूने लिहिलेले हे पहिले आत्मचरित्र. त्यानंतर १९६०मध्ये लेकर यांनीच ‘ओव्हर टू मी’ हे दुसरे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले, पण या आत्मचरित्रामध्ये असलेली भाषा बऱ्याच जणांना आवडली नाही आणि त्यामुळे या आत्मचरित्राला चांगला प्रतिसाद मिळू शकला नाही. भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी १९७७मध्ये ‘सनी डेज’ नावाचे आत्मचरित्र लिहिले होते. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी बिनधास्तपणे सर्व गोष्टींचा उलगडा केला होता. त्यामध्ये भारतीय क्रिकेट मंडळावरील टीका असो किंवा खेळाडूंबाबतची आपली मते असोत, जे जसे आहे तसेच बेधडक आणि प्रामाणिकपणे सर्व गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या. त्यांनी ५-६ दौऱ्यांनंतरच हे आत्मचरित्र फारच लवकर लिहिल्याचे बोलले गेले, पण आत्मचरित्रामध्ये एवढे थेट विचार कुणीच मांडले नाहीत. भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्या ‘स्ट्रेट फ्रॉम दी हार्ट’ या आत्मचरित्रामध्ये फाळणीबाबतच्या घटनांच्या उल्लेखांनी बऱ्याच जणांना भावुक केले होते. युवराज सिंगने कर्करोगातून सहीसलामत बाहेर पडल्यावर ‘दी टेस्ट ऑफ माय लाइफ’ हे लिहिलेले आत्मचरित्र हेलावून टाकणारे होते, त्याचबरोबर ते प्रेरणादायीसुद्धा होते. मैदानावरचा लढवय्या युवराज आयुष्यातही कसा झुंजला, याचा उलगडा या आत्मचरित्रातून झाला.
काही आत्मचरित्रांनी जसे भावुक केले, प्रेरणा दिली, तशी बरीच क्रिकेटपटूंची आत्मचरित्रे वादग्रस्त ठरली. इंग्लंडचा माजी तडाखेबंद फलंदाज केव्हिन पीटरसनने ‘केपी : दि ऑटोबायोग्राफी’ या आत्मचरित्रामध्ये प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉस आणि क्रिकेट मंडळावर कडाडून टीका केली होती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ‘कॉन्ट्रोव्हर्सियली युवर्स’ या आत्मचरित्रामध्ये ‘सचिन तेंडुलकर पळपुटा होता, तो माझ्या गोलंदाजीला घाबरायचा’ असे म्हणत एकच खळबळ उडवली होती. भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांनी ‘इंडियन समर’ या आत्मचरित्रामध्ये भारतामध्ये आलेल्या कटू अनुभवांबाबत लिहिले होते. खास करून कर्णधार सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून बदलण्याबाबत केलेला उलगडा वादग्रस्त ठरला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘ट्र कलर्स’ या आत्मचरित्रामध्ये ‘मंकी गेट’ प्रकरणाबाबत सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावर तोफ डागली होती. इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू इयान बोथम यांनी ‘हेड ऑन’ या आत्मचरित्रामध्ये उत्तेजक पदार्थाचा केलेला गैरवापर आणि क्रिकेट कारकिर्दीतील चुकांचा पाढाच वाचला होता.
आयुष्य हे खरे तर खासगी असायला हवे, पण तुम्ही जेवढे वैयक्तिक लिहिता तेवढे ते वैश्विक होत जाते, असे म्हटले जाते. त्यामुळेच आत्मचरित्र लिहिण्याचा खटाटोप बरेच जण करत असावेत. निवृत्तीनंतर मिळकतीचाही हा एक चांगला उद्योग असतो. त्यामुळेच आत्मचरित्रामध्ये सत्य लिहिण्यापेक्षा ते अधिक वादग्रस्त, मसालेदार लिहिण्यावर काही जणांचा भर असतो. सचिन नेहमीच सरळ बॅटने मैदानावर खेळला, त्याचे फटके ‘मास्टरस्ट्रोक’ असायचे. पण आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी त्याने खेळलेली खेळी त्याच्या प्रतिमेला तडा देणारीच, चुकीच्या फटक्यांनी भरलेली. आपले आत्मचरित्र ‘खपवण्यासाठी’ बऱ्याच जणांनी वाद-विवादांचा मार्ग पत्करला होता. प्रकाशनापूर्वी वादंग केले तर आत्मचरित्राला चांगली मागणी मिळते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण नजाकतभऱ्या लोकापवादात्मक शैली असलेल्या सचिनवरही आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी त्याच बुरसटलेल्या वाटेवरून जाण्याची वेळ यावी, हीच खरी शोकांतिका आहे.