खेळाडूपेक्षा खेळ मोठा असतो, असे म्हटले जाते. पण काही महान खेळाडू खेळ आणि देशाच्या सीमा अलवारपणे ओलांडून पुढे निघून जातात. त्या महान खेळाडूचा एखादा खास सामना असेल तर त्या सामन्यापेक्षा साऱ्यांचे लक्ष केंद्रित झालेले असते आणि हेच चित्र बुधवारपासून पुढील पाच दिवस पाहायला मिळेल ते इडन गार्डन्सवरील वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कारकीर्दीतील १९९ वा आणि इडन गार्डन्सवरील अखेरचा सामना असल्याने कोलकातावासियांच्या उत्साहाला आणि आनंदाला भरते आले आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरु होणारा हा सामना सचिनमय होणार असून त्याचा खेळ पाहण्याची पर्वणी कोलकातावासियांना असेल. त्यामुळे या सामन्याचा खऱ्या अर्थाने ‘मॅन ऑफ द मॅच’ सचिनच असेल.
ऑस्ट्रेलियाबरोबरच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केल्याने भारताचा संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी चांगल्या लयीत असेल. भारताची फलंदाजांनी पुन्हा एकदा लौकिकाला साजेशी कामगिरी केल्याने त्यांच्यावर मुख्यत्वेकरून संघाची भिस्त असेल. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये या सामन्यात पदार्पण करता येते का, ही उत्सुकतेची बाब असेल. रोहितच्या मागून आलेले फलंदाज कसोटी संघात स्थिरस्थावर झालेले पाहायला मिळाले आहे, पण रोहितला अजूनपर्यंत ही संधी मिळाली नव्हती. सध्या तो चांगल्या फॉर्मात असून या सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळेल, अशी आशा आहे. सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. सलामीवीर मुरली विजयच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल, कारण त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर संघासाठी अजिंक्य रहाणेचा पर्याय खुला असू शकतो. गोलंदाजीमध्ये आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांना इडन गार्डन्सच्या खेळपट्टीचा नूर पाहता संघात हमखास स्थान मिळू शकते. मध्यमगती आणि वेगवान गोलंदाजांचे समीकरण धोनी कसे ठरवतो, याकडेही साऱ्यांचे लक्ष असेल.
डॅरेन सॅमीच्या कप्तानीखालील वेस्ट इंडिजचा संघ चांगलाच समतोल असून त्यांच्याकडे भारताला धक्का देण्याची क्षमता आहे. शिवनारायण चंदरपॉलसारखा कसोटी क्रिकेटसाठी योग्य फलंदाज त्यांच्याकडे आहे. ख्रिस गेलसारखा तडफदार सलामीवीरही त्यांच्याकडे आहे. मधल्या फळीचा भार यावेळी चंदरपॉलबरोबर डॅरेन ब्राव्हो आणि मालरेन सॅम्युअल्स यांच्यावर असेल. सॅमी, केमार रोच आणि टिनो बेस्ट यांचा अपवाद वगळता वेस्ट इंडिजची गोलंदाजी अनुनभवी दिसत असली तरी त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता आहे.
सचिनच्या निवृत्तीची धामधूम विचलित करत नाही- धोनी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २००व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. कोलकाता येथे होणारी वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी त्याची १९९वी कसोटी असणार आहे. गोलंदाजांवर हुकूमत गाजवणाऱ्या सचिनला ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी कोलकातावासीय उत्सुक आहेत. हा ऐतिहासिक क्षण जपण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जय्यत तयारी केली आहे. मात्र ही सगळी धामधूम अन्य खेळाडूंसाठी विचलित करणारी नाही असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने सांगितले. सचिनोत्सवात हरवून न जाता खेळावर, सरावावर लक्ष केंद्रित करण्याचा सगळे खेळाडू प्रयत्न करत आहेत. सचिनच्या निवृत्तीचा क्षण साजरा होणे साहजिक आहे. मात्र हे होणार याची पूर्वकल्पना असल्याचे त्यादृष्टीने मानसिक तयारी करता येते. सचिनोत्सवात खेळाकडे दुर्लक्ष होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. आम्ही खेळाप्रती अतिशय गंभीर आहोत. सचिनच्या निवृत्तीच्या घोषणेने ड्रेसिंगरूममधील वातावरण जराही बदललेले नाही. आमच्या सराव पद्धतीतही काहीही फरक पडलेला नाही. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतही सर्व काही नेहमीप्रमाणेच होते. वातावरण नेहमीसारखे ठेवण्यात संघातील खेळाडूंची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. काही गोष्टी अपरिहार्य असतात. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शनासह जिंकणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. मालिकाविजय सचिनला समर्पित करायचा का यावर नंतर निर्णय घेऊ.  सचिनने नेहमीच संघातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. कामगिरीत सुधारणा करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात सचिन युवा खेळाडूंशी अनेकदा संवाद साधतो. त्यामुळे ही मालिका याला अपवाद नाही. शेवटच्या कसोटी मालिकेत सचिनला कसा निरोप देणार, या प्रश्नावर मात्र धोनीने तपशिलात जाण्यास नकार दिला. ते एक गुपित असून, कोलकातानंतर आणखी एक कसोटी होणार आहे.