भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र ६ नोव्हेंबरला मुंबईत प्रकाशित होणार आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ नामक हे आत्मचरित्र हॉडर अँड स्टॉटन ही प्रकाशन संस्था जगभरात तर हॅचेटे इंडिया भारतात प्रकाशित करणार आहे. क्रिकेटतज्ज्ञ बोरिया मझुमदार यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. याबाबत सचिन म्हणाला की, ‘‘मला माझी कथा ज्या पद्धतीने मी खेळलो त्याच रीतीने प्रामाणिकपणे लोकांसमोर मांडायची आहे. मी याआधी सर्वासमोर न आणलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘३५ वर्षांपूर्वी मुंबईत माझ्या बालपणी हाती घेतलेली क्रिकेट बॅट ते वानखेडे स्टेडियमवर आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरच्या डावानंतर पॅव्हेलियनकडे परतेपर्यंतचे अनेक क्षण मी यात रेखाटले आहेत.’’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सचिन आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यातील ७४ धावांची संस्मरणीय खेळी खेळून परततानाचे छायाचित्र आहे. ‘‘माझे आत्मचरित्र ६ नोव्हेंबरला प्रकाशित होते आहे. मी अतिशय उत्सुक आहे,’’ असे सचिनने ‘ट्विटर’वर म्हटले आहे.