महिला क्रिकेटला क्रीडाप्रेमी फारसे महत्त्व देताना दिसत नसले तरी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मात्र पाठिंबा देत त्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महिला विश्वचषक स्पर्धेबद्दल मी आतूर आहे. क्रिकेटच्या जागतिकीकरणात महिलांच्या स्पर्धाचा मोठा वाटा आहे, असे मत सचिनने व्यक्त केले आहे.

‘महिला क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल होत आहेत. थायलंडसारखा संघ विश्वचषकाच्या पात्रता फेरीत खेळत असल्याचे पाहून आश्चर्य वाटले, पण हे वास्तव आहे. पुढील आठवडय़ामध्ये विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी खेळवली जात असून  या स्पर्धेची मला उत्सुकता असेल,’ असे सचिन म्हणाला.

महिला क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेचेही सचिनने यावेळी कौतुक केले. ‘भारताचा महिली संघ म्हटला की झुलान गोस्वामी आणि मिताली राज या दोघींची प्रामुख्याने आठवण येते. त्याचबरोबर पाकिस्तानच्या सना मीर आणि बिसमाह महरूफ, दक्षिण आफ्रिकेची मॅरीझेन कॅप या खेळाडूंनी आपले स्थान निर्माण केले आहे.’