पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० हून जवान मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवा, त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाका, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. ३० मे पासून सुरु होणाऱ्या World Cup 2019 मध्ये १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. पण हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटत आहे. याबाबत बोलताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सामना रद्द करून पाकला २ फुकटचे गुण का द्यायचे? असा सवाल उपस्थित केला होता. यावर ज्येष्ठ पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी सचिनला तू तुझे २ गुण घे आणि केराच्या टोपलीत टाक, असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे.

सामन्यावर बहिष्कार टाकून पाकिस्तानला फुटकचे २ गुण का द्यायचे? असा सवाल सचिन तेंडुलकर याने केला होता. भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखायला हवे. त्यामुळे विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत करावे आणि आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड सुरूच ठेवावी, असे मत सचिनने व्यक्त केले होते. यावर अर्णव गोस्वामी एका वाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले की मी देवावर विश्वास ठेवत नाही. सचिनचे वक्त्यव्य हे १०० टक्के चुकीचे आहे. मला तुमचे २ गुण नकोत. मला माझ्या शहीद जवानांच्या हौतात्याचा बदला हवा आहे. त्यामुळे सचिनने त्याचे ते २ गुण घ्यावे आणि केराच्या टोपलीत टाकावेत, असे गोस्वामी म्हणाले.

सचिन हा देशद्रोही आहे, असे अर्णव गोस्वामी म्हणाले अशी चर्चा गेल्या काही दिवस रंगली आहे. मात्र ते सचिनला देशद्रोही म्हणाले नाही एका व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे.

याशिवाय, पाकिस्तानशी खेळू नका असे सांगणारा सचिन हा पहिला व्यक्ती असायला हवा होता. तसेच त्या पाठोपाठ सुनील गावसकर यांनीही हेच म्हणायला हवे होते, असेही स्पष्ट मत अर्णव गोस्वामी यांनी व्यक्त केले.