सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यासारख्या खेळाडूंसाठी बॅट बनवणाऱ्या अश्रफ भाईंच्या हालाकीच्या परिस्थितीविषयीची माहिती व्हायरल झाली होती. नावाजलेल्या क्रिकेटपटूंसाठी बॅट बनवणारे अश्रफ भाई सध्या आजारी असून ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सत्तरीच्या घरात असलेले अश्रफ चौधरी फलंदाजाच्या गरजेनुसार त्याला बॅट बनवून द्यायचे. तुटलेली बॅट जोडून देणे, बॅटचे वजन कमी करुन देणे, हँडल ट्रीम करणे अशी कामे ते करायचे. बॅट हातात घेतल्यानंतर फलंदाजाला समाधान मिळाले पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न असायचा. पण आजारपणामुळे मागच्या काही आठवडयापासून अश्रफ भाई उपनगरातील एका रुग्णालयात अॅडमिट आहेत. किडनी स्टोन आणि तब्येतीच्या अन्य कारणांमुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. पण आर्थिक अडचणींमुळे उपचारात समस्या उद्भवत आहेत.
सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच अनेक स्तरातून अश्रफ भाईंना मदतीचे हात पुढे यायला लागले. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही अश्रफ भाईंना मदत करण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर खुद्द सचिन तेंडुलकरही अश्रफ भाईंच्या मदतीसाठी धावून आला आहे. “सचिनने अश्रफ भाईंशी फोनवरुन संवाद साधला. सचिनने अश्रफ भाईंना आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा बहुतांश भार सचिनने उचलला आहे.” अश्रफ भाईंची कहाणी प्रसारमाध्यमांसमोर आणणाऱ्या प्रशांत जेठमलानी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.
प्रशांत जेठमालानी हे मागच्या १५ वर्षापासून अश्रफ चौधरी यांना ओळखतात. अश्रफ यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने प्रशांत त्यांच्या उपचारासाठी निधी जमा करायला मदत करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अश्रफ यांची तब्येत खालावली आहे. त्यातच त्यांना किडनी स्टोनचा आजार व इतर प्रकृतीच्या तक्रारीही असल्याची माहिती प्रशांत यांनी दिली. लॉकडाउन काळात मुंबई क्रिकेट बंद असल्यामुळे अश्रफ भाईंचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे, ज्याचा आर्थिक फटका त्यांना बसला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 8:44 pm