देशात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत आहेत. पोलिस, वैद्यकीय कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा २१ दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये सतत काम करत आहेत. तर दुसरीकडे अनेक क्रीडापटूंनी यावेळी आपली सामाजिक जबाबदारी ओळखत, मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत केली आहे. काही खेळाडूंनी गरजू व्यक्तींना अन्नधान्य, मास्कचंही वाटप केलं आहे. या सर्व परिस्थितीत क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने आतापर्यंत कोणतीही मदत जाहीर केली नव्हती. लोकांनी घरात राहून स्वतःची कशी काळजी घ्यावी याबाबत सचिन वारंवार मार्गदर्शन करत होता. सोशल मीडियावर सचिनकडून कोणतीही मदत न आल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली होती.

अखेरीस सचिनने करोनाविरुद्ध लढ्यात मैदानात उतरत सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केलेली आहे. मुंबई मिररने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनने आपण केलेल्या मदतीविषयी काहीही न बोलण्याचं ठरवलं आहे. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सचिनने मदत केली आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानानंतर, सचिनने २५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं दान केलं होतं.

सचिन व्यतिरीक्त मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारीही MCA ने दाखवली आहे. आतापर्यंत पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा या खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात आपलं सामाजिक भान राखत मदत केली आहे.

अवश्य वाचा – करोनाशी लढा : पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना धोनीची मदत