आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर इतर खेळातील खेळाडूंना समान संधी मिळावी याकरता मनापासून प्रयत्न करताना दिसतोय. बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल या खेळांना भारतात ग्लॅमर मिळवून देण्यासाठी सचिन प्रयत्न करतोय. राज्यसभेत Right to Play या विषयावरचं सचिनचं भाषण खासदारांच्या गोंधळापुढे होऊ शकलं नाही. यानंतर सचिनने आपल्या फेसबूक अकाऊंटवर १५ मिनीटांचं भाषण अपलोड करत क्रीडारसिकांची मनं जिंकली होती. यानंतर सचिनने देशात महिला क्रीडापटूंना मिळणाऱ्या संधीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

तुमच्या मुलींना जर तुम्ही योग्य शिकवणं दिलीत, तर पुढे जाऊन त्या सिंधू, सायना, मिताली राज यांच्याप्रमाणे मोठं काम करतील. सर्वांना समान संधी पाहण्याचा हक्क देवाने दिलेला आहे, मग त्यात भेदभाव करणारे आपण कोण?? असं म्हणत सचिनने महिला खेळाडूंना अधिकाधीक संधी मिळावी असं मत व्यक्त केलं आहे.

यावेळी सचिनने भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सांगितललेल्या एका गोष्टीची आठवण आपल्या चाहत्यांना करुन दिली. “भारतीय खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे, मात्र त्या प्रतिभेला वाव देणाऱ्या प्रशिक्षकांची कमी असल्यामुळे आपण मागे राहतो.” पुलेला गोपीचंद यांचं हे मत अगदी खरं असून आगामी ऑलिम्पिक स्पर्धांच्या दृष्टीकोनातून खेळाडूंना अधिक निष्णात प्रशिक्षक उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचंही सचिनने यावेळी बोलून दाखवलं.