क्रिकेटपटूसाठी त्याची पहिली बॅट ही खूप स्पेशल असते. मग क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची पहिली बॅट कुणी दिली होती? कोणती होती? याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल. सचिनच्या करिअरमध्ये त्याच्या भावाचा खूप मोठा वाटा असल्याचे आपल्याला माहित आहे. खुद्द सचिननेही अनेकदा त्याचा भाऊ अजित तेंडुलकर याला आपल्या आजवरच्या यशाचे श्रेय दिले आहे. पण सचिनच्या बहिणीचेही सचिनच्या कारकिर्दीमध्ये तितकेच योगदान राहिले आहे.

सचिनची बहिण सविता यांनी सचिनला पहिली बॅट भेट म्हणून दिली होती. खास काश्मीरमधून ही बॅट बनवून घेण्यात आली होती. लवकरच सचिनचा चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात सचिनच्या सुरूवातीच्या काळापासून ते यशाच्या शिखरावर पोहोचण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहायला मिळणार आहे.

 

”कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याची पहिली बॅट खूप खास असते. कारण तो आपल्या कारकिर्दीची सुरूवात त्या बॅटने करतो. सचिनलाही त्याला पहिली बॅट त्याच्या बहिणीने दिली होती हे अजूनही लक्षात आहे.”, असे चित्रपटाचे निर्माते रवि भागचंदका यांनी सांगितले.

सचिनच्या चित्रपटात त्याच्या जीवनातील अनेक पैलूंचा उलगडा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘सचिन: ए बिलियन ड्रीम्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सचिनच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.