भारताचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांचे प्रतिपादन

मुंबई : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केलेल्या विक्रमी खेळीनंतर सचिनला संघात स्थान देण्याबाबत नरेन ताम्हणे आग्रही असल्याने तशी चर्चादेखील सुरू झाली होती. मात्र अवघ्या १५ वर्षांच्या मुलाला संघात स्थान देणे ही खूप घाई ठरेल, असे त्या वेळी माझ्यासह संघ निवडकर्त्यांना वाटत होते. त्याला चेंडू लागून काही गंभीर दुखापत झाली, तर माध्यमे निवडकर्त्यांवर टीका करतील, अशी भीतीही मनात होती. त्यामुळेच त्याला प्रथम रणजीत खेळवण्याचा निर्णय घेऊन रणजी संघात स्थान दिले, अशी आठवण भारताचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी सांगितली.

सचिन तेंडुलकरच्या ४५ व्या वाढदिवसाच्या पाश्र्वभूमीवर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माधव आपटे, जेफ लॉसन, सुधीर वैद्य, जतीन परांजपे यांनीही सचिनचे अनेक किस्से ऐकवले. ‘‘भारतीय संघ ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव करत असतानाच्या काळात तिथे कपिल आणि चेतन शर्माला सचिनला गोलंदाजी टाकण्याचा आग्रह वासू परांजपे यांनी केला. वासू हे माझे पहिल्या रणजीचे कर्णधार असल्याने त्यांचा आग्रह मला मोडता आला नाही. मी त्या दोघांना सचिनला दोन-चार चेंडू टाकण्यास सांगितले. सचिनने त्या वेळीदेखील या दोघांची गोलंदाजी अत्यंत चांगल्या प्रकारे खेळून काढली. त्यानंतर सचिन जेव्हा भारतीय संघात आला, त्या वेळी त्याचे ओल्ड ट्रॅफर्डवरचे पहिले शतक तसेच पर्थसारख्या उसळत्या खेळपट्टीवरील शतकी खेळी ही अत्यंत आश्वासक होती. त्यातही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची १७० धावांची खेळी ही माझ्या दृष्टीने त्याच्या कारकीर्दीमधील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक असल्याचेही वेंगसरकर यांनी नमूद केले.

५० वर्षांत बघितलेला सर्वोत्कृष्ट युवा

एकदा हेमंत केंकरे यांनी मला सचिनचा खेळ नीट लक्ष देऊन बघायला सांगून मत विचारल्याची आठवण ज्येष्ठ क्रिकेटपटू माधव आपटे यांनी सांगितली. त्या संध्याकाळी मी केंकरे यांना सांगितले की, मी वयाच्या नवव्या वर्षांपासून सामने पाहत असून त्याला जवळपास ५० वर्षे झाली. पण इतकी असामान्य प्रतिभा वयाच्या १४ व्या वर्षी कुणातही बघितलेली नाही, असेही आपटे यांनी नमूद केले.