अष्टपैलू सुरेश रैनाची भारतीय संघातील पुनरागमन करण्याची आस अद्यापही कायम आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेत असल्याचे त्याने नुकतेच ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. त्याने खेळीच्या शैलीत देखील सुधारणा केली आहे. यापूर्वी सुरेश रैना फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात मैदानात दिसला होता. या सामन्यात त्याने ६३ धावांची लक्षवेधी खेळी केली. त्यानंतर आयपीएलमध्ये रैना गुजरात लायन्स संघाचे नेतृत्व करताना दिसला. या स्पर्धेत देखील त्याने लक्षवेधी कामगिरी केली. आयपीएल स्पर्धेतील १४ सामन्यात रैनाने ४२२ धावा केल्या होत्या. या खेळीमुळे भारतीय संघात स्थान मिळण्याचे निश्चित समजले जात असताना केदार जाधव आणि मनिष पांडेला मिळालेल्या संधीमुळे रैनाला पुन्हा प्रतिक्षेत बसावे लागले.

सध्याच्या घडीला भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी रैना कठोर मेहनत घेत आहे. यासाठी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची खास भेट देखील घेतली. यावेळी सचिनने आत्मविश्वास जागृत केल्याचे रैनाने म्हटले आहे. तुला स्वत:ला सिद्ध करण्याची काहीच गरज नाही. तू खूप काही केल आहेस. सध्या तू फक्त क्रिकेटचा आनंद घे, असा सल्ला सचिनने रैनाला दिला. सचिनने दाखवलेल्या विश्वासानंतर रैना कठोर मेहनत घेत असून, दुलीप करंडक स्पर्धेत सहभागी होऊन पुन्हा भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न मनी बाळगून आहे. यावेळी सोशल मीडियावरील सक्रियतेबद्दल रैना म्हणाला की, सोशल मीडियाच्या सक्रियेतेमध्ये केवळ मी अधिक सक्रिय आहे, असे नाही. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू त्यांचा आनंदी क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी सोशल मीडियावर काही आनंदी क्षण शेअर करणे चुकीचे नाही.

गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मैदानातील हालचालीवरुन त्याच्या तंदूरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर रैना म्हणाला की, मागील पाच ते सहा महिन्यांपासून मी तंदूरुस्तीवर अधिक भर दिला आहे. या काळात मी तब्बल ५ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे मी मैदानात पुन्हा पूर्वीप्रमाणे कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे तो म्हणाला. भारतीय संघात सध्या मध्य फळीतील फलंदाजीमध्ये चांगलीच चढाओढ दिसत आहे. त्यामुळे सुरेश रैना निवडसमितीचे लक्ष वेधण्यास यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.