Women’s T20 WC 2020 : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली (७५) आणि बेथ मूनी (७८*) यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि विजेतेपदाची संधी गमावली.

T20 World Cup : हृदयद्रावक! पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर

या पराभवानंतर भारतीय महिला खेळाडू अत्यंत हवालदिल झाल्याचे दिसून आले. पण क्रिकेटचा देव आणि तब्बल ६ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळलेला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने भारतीय महिला संघाला एक मोलाचा सल्ला दिला. “ऑस्ट्रेलियाने संघाचं विजेतेपदाबद्दल अभिनंदन. भारतीय महिला संघासाठी दिवस खूपच कसोटीचा होता. आपला संघ युवा खेळाडूंचा आहे. त्यामुळे अनुभवाने हा संघ खूप काही शिकेल. जगभरात तुम्ही खूप तरूणांना प्रेरित केले आहेत. आम्हाला तुमचा अभिमान आहे. अथक परिश्रम करत राहा आणि धीर अजिबात सोडू नका. एक दिवस विश्वचषक नक्कीच आपला असेल”, असा सल्ला देत सचिनने विजेतेपदाचा विश्वास व्यक्त केला.

T20 World Cup : स्पर्धा गाजवणारी शफाली फायनलमध्ये अपयशी

अंतिम सामन्यात टीम इंडियाची सुमार कामगिरी

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात केली. एलिसा हेलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीनेही जबाबदारीने खेळ केला. तिने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ ची धावसंख्या गाठून दिली.

VIDEO : कौतुकास्पद! चिमुकल्या दिव्यांग चाहतीला दिलं विश्वविजेतेपदाचं सुवर्णपदक

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. तानिया भाटीया दुखापतग्रस्त झाली. त्यानंतर जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर, स्मृती मानधना ११ धावांवर तर कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने एकाकी झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.