नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतले पहिले २ सामने जिंकत, भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. सलामीवीर रोहित शर्माला पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजीत अपयश आलंय, मात्र त्याचा फलंदाजीतला फॉर्म अजुनही कायम आहे. टी-२० आणि वन-डे मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाहीये, २०१९ साली रोहितची कसोटी क्रिकेटमधली कामगिरी पाहता त्याला पुन्हा भारतीय संघात जागा मिळण्याची शक्यता आहे.

याव्यतिरीक्त लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ हे खेळाडूदेखील भारतीय संघात पुनरागमन करु शकतात. मात्र भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या मते कसोटी मालिकेत रोहित शर्मासमोर मोठं आव्हान असणार आहे. “नवीन खेळपट्टी आणि वातावरणात जाऊन सलामीला यायचं हे मोठं आव्हान असतं. रोहितने याआधी न्यूझीलंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे, त्याला खेळपट्ट्यांचा चांगला अंदाज आहे.”

अवश्य वाचा – हार्दिकचं भारतीय संघातलं पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता

मात्र कसोटी मालिका रोहित शर्मासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. खेळपट्टी कशी असेल यावर अनेक गोष्टी अवलंबून असतील. समजा खेळपट्टीवर काही भाग हिरवळ असेल तर रोहितसाठी हे मोठं आव्हान असणार आहे, सचिन पत्रकारांशी बोलत होता. दरम्यान मालिकेत २-० ने आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ मालिकाविजयाचं उद्दीष्ट बाळगून आहे. बुधवारी तिसरा टी-२० सामना रंगणार आहे.