बारामती येथील स्टेडियमचे सचिन तेंडुलकरच्या हस्ते लोकार्पण
अटीतटीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्र संघावर तीन गडी राखून मात करीत मुंबईने येथे नव्याने बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे उद्घाटन साजरे केले.
बारामती नगरपरिषदेने बांधलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या लोकापर्ण सोहळ्यानिमित्त हा सामना आयोजित करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करून महाराष्ट्र संघाने सर्व बाद १५३ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला सात विकेट गमवाव्या लागल्या.
खासदार शरद पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या प्रसंगी पवार यांनी सांगितले, बारामतीमधील हा ऐतिहासिक सोहळा आहे. या स्टेडियमवर एकेकाळी खूपच घाण होती. आता या स्टेडियमचे रूप बदलले आहे. भविष्यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा निश्चित होतील. मी प्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालो नंतर देशाचा झालो. आशियाई संघटनेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष झालो त्या वेळी मला वाटत होते बारामतीमध्येसुध्दा एक चांगल्या प्रतीचे स्टेडियम व्हावे आणि तो माझ्या मनातील विचार आज पूर्ण झाला. आता येथे उत्तम दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने सांगितले, पवार यांच्याबद्दल मी काय बोलणार. येथे अतिशय चांगल्या पध्दतीचे सुंदर स्टेडियम तयार झाले असून या स्टेडियमवर आता खेळाडूंनी परिश्रम घेत खेळ केला तर त्यांना यश निश्चित मिळेल. पावसाळ्यात मला मुंबईत सराव करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती स्टेडियम नव्हते. मी पवार यांच्याकडे या विषयी बोलल्यानंतर त्यांनी मला स्टेडियम उपलब्ध करून दिले. भरपूर सराव करा स्वप्न पाहा त्याचा पाठलाग करा आलेले आव्हान स्वीकारत राहा यश निश्चित मिळतेच. या सोहळ्याला अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, वसीम जाफर, अमोल मुजुमदार, चंद्रकांत पंडित, पांडुरंग साळगावकर, सुधाकर शानबाग आदी उपस्थित होते.