भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज युवराज सिंग याने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. युवराजने स्पर्धेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावलाच, पण त्याचसोबत त्याने गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. पण त्यानंतर त्याच वर्षी युवराजला कर्करोग असल्याचे निदान झाले. युवराजने त्यावर परदेशात उपचार घेतले आणि कर्करोगावर मात केली.

कर्करोगावर मात केल्यानंतर युवराज पुन्हा क्रिकेट खेळू शकेल की नाही याबाबत शंका होती. युवराजला स्वत:लादेखील आत्मविश्वास कमी होता. अशा वेळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याला मार्ग दाखवला. युवराजने स्पोर्ट्सकीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा उलगडा केला. युवराजला भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याआधी देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आपली लय सिद्ध करण्यास सांगण्यात आले होते. युवराजला ते फारसं पटलं नव्हतं. पण सचिन तेंडुलकरने त्याला एका मोलाचा संदेश दिला.

“आपण क्रिकेट का खेळतो? हे कायम लक्षात ठेव. प्रत्येकालाच आंतरराष्ट्रीय संघातून क्रिकेट खेळून आपली चमक दाखवायची असते. पण क्रिकेटमागचं मूळ कारण असतं ते क्रिकेटवरील प्रेम. जर तुमचं खेळावर प्रेम असेल तर तुम्ही (देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय न पाहता) खेळलंच पाहिजे. मी जर तुझ्याजागी असतो तर काय केलं असतं माहिती नाही, पण जर तू खेळावर प्रेम करत असशील तर तू खेळत राहायला हवंस. तू किती खेळायचं हेदेखील तूच ठरवायला हवंस. तुझ्या निवृत्तीचा निर्णय लोकांनी घेता कामा नये”, अशा शब्दात सचिनने युवराजला महत्त्वपूर्ण सल्ला देत मार्ग दाखवला.

“मी सचिन पाजींशी कायम चर्चा करत असायचो. मी कमबॅकनंतर ३-४ वर्षे क्रिकेट खेळलो. भारतीय संघात माझं स्थान पक्क नव्हतं. मी २०१४ आणि २०१७चा टी-२० विश्वचषक खेळ खेळलो. पण खेळताना मलाच समजलं की माझं शरीर आता तितकं तंदुरूस्त नाही. जिद्दीच्या जोरावर मी त्या काळात वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी केली. पण अखेर सत्य स्वीकारून मी तो विषय सोडून दिला”, असेही युवराज म्हणाला.