काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक दहा हजार धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला, त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. या वेळी त्याला या विक्रमाबद्दल आणि सचिनशी करण्यात आलेल्या तुलनेबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर कुक म्हणाला की, ‘‘सचिन हा अद्भुत गुणवत्ता असलेला भारताचा महान फलंदाज होता, त्याच्याबरोबर तुलना करण्यासाठी बराच वेळ लागेल.’’
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात कुकने दहा हजार धावांचा पल्ला गाठला. पण अजूनही सचिनच्या कसोटी धावांचा (१५,९२१) विक्रम मोडण्यासाठी कुकला जवळपास सहा हजार धावांची गरज आहे. कुकने आतापर्यंत १२८ कसोटी सामन्यांमध्ये १०,०४२ धावा केल्या आहेत.
‘‘सचिनसारखा मी महान क्रिकेटपटू नक्कीच नाही. सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी अजूनही मी सहा हजार धावांनी पिछाडीवर आहे, यासाठी बराच कालावधी लागेल,’’ असे श्रीलंकेविरुद्धच्या लॉर्ड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘जाहीररीत्या मी कधीही जास्त भाष्य केले नाही. पण खासगी आयुष्यामध्ये तुम्ही काही लक्ष्य डोळ्यापुढे नक्कीच ठेवत असता आणि ते साध्य करण्याचा प्रयत्नही करत असता. इंग्लंड संघाचा कर्णधार असल्यामुळे वैयक्तिक लक्ष्य गाठण्यापेक्षा संघाचे हित माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे.’’