सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूबरोबर १६ वर्ष ड्रेसिंग रूममध्ये वावरायला मिळाले ही सन्मानाची गोष्ट आहे. एवढय़ा प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने स्वत:ला कधीही खेळापेक्षा मोठे मानले नाही आणि यातच त्याच्या महानतेचे गमक आहे. आपल्या अद्भूत खेळासह मैदानावर नवनवे विक्रम रचण्याची ताकद असतानाही सचिन नेहमीच नम्र राहिला. हेच त्याच्या मोठेपणाचे लक्षण आहे, असे मत शैलीदार फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मणने व्यक्त केले.
‘‘खेळापेक्षा आपण कधीही मोठे नाही. युवा खेळाडूंनी सचिनकडून शिकण्यासारखी ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याने नेहमीच खेळाचा सन्मान केला. त्याच्या सहकाऱ्यांच्या साथीने तो अधिकच मोठा होत गेला. सचिन एक अलौलिक प्रतिभेचा खेळाडू आहे. खेळभावना जपतच तो नेहमी खेळला. संघाची गरज काय आहे, याला तो प्राधान्य देत असे. दुखापतीतून सावरत तो ज्या पद्धतीने पुनरागमन करतो आणि देशाचे प्रतिनिधित्व करतो, ते अत्यंत प्रेरणादायी आहे. तो फक्त क्रिकेटपटूंसाठी नव्हे तर सर्व क्रीडापटूंसाठी एक आदर्श खेळाडू आहे,’’ असे लक्ष्मणने पुढे सांगितले.
‘‘प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूप्रमाणे मीही सचिनला पाहतच क्रिक्रेट खेळायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर १६ वर्षे खेळायला मिळणे, हा माझा सन्मान आहे. १६व्या वर्षी जगातल्या भेदक गोलंदाजांचा त्याने समर्थपणे सामना केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९९६मध्ये मी पदार्पण केले, त्यावेळी ड्रेसिंगरूममधील वातावरण हलकेफुलके ठेवण्यात सचिनची भूमिका महत्त्वाची आहे,’’ असेही लक्ष्मणने सांगितले.