इंडियन सुपर लीग फुटबॉलमधील (आयएसएल) केरळ ब्लास्टर्स संघातील आपला मालकी हक्क काढून घेतल्यानंतरही त्या संघासाठी आपल्या हृदयात नेहमीच खास जागा राहील, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने रविवारी व्यक्त केली.

२०१४पासून सुरू झालेल्या ‘आयएसएल’च्या पहिल्या हंगामापासून सचिन केरळ ब्लास्टर्स संघाचा अविभाज्य घटक होता. सलग चार वर्षे संघाचा मालकी हक्क बजावल्यानंतर यंदा मात्र त्याने माघार घेतली आहे. याबाबत सचिन म्हणाला, ‘‘पाचव्या वर्षांत पदार्पण केल्यामुळे क्लबला पुढील पाच वर्षे व त्यापुढील काळासाठीही तयारी केली पाहिजे. खेळाडूंशी चर्चा आणि विचारविनिमय करूनच मी संघाच्या मालकी हक्कातून माझा वाटा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.’’

‘‘मला खात्री आहे की केरळ ब्लास्टर्स सध्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मला या संघाचा अभिमान असून माझ्या हृदयात त्यांच्यासाठी विशेष स्थान असेल,’’ असे सचिन म्हणाला. २०१४ व २०१६मध्ये केरळ ब्लास्टर्स संघाने आयएसएलच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेस त्यांना अ‍ॅटलेटिको कोलकाता संघाकडून पराभव पत्करावा लागला.

‘‘सचिनने माघार घेतल्यामुळे केरळ ब्लास्टर्सच्या मालकी हक्कात ८० टक्के वाटा असणारे आय क्वेस्ट, चिरंजीवी आणि अल्लू अरविंद आदी मंडळी सचिनच्या २० टक्के हक्कातील आपापसात वाटणी करून घेतील,’’ असे केरळ ब्लास्टर्स संघाच्या व्यवस्थापनाने निवेदनात म्हटले.