इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात सचिन तेंडुलकरचे मत

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘चायनामन’ कुलदीप यादवच्या फिरकीचे चक्रव्यूह कसे भेदायचे, याकरिता इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने रणनीती निश्चित केली असेल. परंतु इंग्लंडमध्ये पाटा खेळपट्टय़ा उपलब्ध झाल्या तर कुलदीप आव्हानात्मक ठरू शकेल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

‘‘कुलदीपची मनगटी शैली ही भिन्न आहे. जागतिक क्रिकेटमधील फार थोडय़ा फलंदाजांमध्ये त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्याची क्षमता आहे. कुलदीपचा योग्य अभ्यास केल्यामुळे रूटला त्याच्या गोलंदाजीचा सामना करता आला,’’ असे सचिनने यावेळी सांगितले.

‘‘इंग्लंडचे अन्य फलंदाज मात्र कुलदीपच्या गोलंदाजीचा तितक्या आत्मविश्वासाने सामना करू शकले नाहीत. सध्याचे इंग्लंडमधील वातावरण कुलदीपसाठी अनुकूल आहे. एकदिवसीय मालिकेप्रमाणेच खेळपट्टय़ा उपलब्ध झाल्या तर भारतासाठी ती उत्तम संधी असू शकेल. मात्र हिरव्यागार खेळपट्टय़ा मिळाल्या तर इंग्लिश वेगवान गोलंदाज मालिकेवर प्रभुत्व दाखवू शकतील,’’ अशी प्रतिक्रिया सचिनने व्यक्त केली.

पहिल्या तीन सामन्यांत भुवनेश्वर कुमार आणि पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमरा खेळू शकणार नाहीत. हे भारतासाठी चिंताजनक आहे, असे सचिनने सांगितले. तो म्हणाला, ‘‘भुवनेश्वरची दुखापत ही भारतासाठी धक्कादायक आहे. त्याच्याकडून मला बऱ्याच अपेक्षा होत्या. गेल्या काही वर्षांत तो अप्रतिम कामगिरी करीत आहे. चेंडूला स्विंग करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील कसोटी मालिकेत तो उपयुक्त ठरला असता.’’