करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. या काळात अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. गेल्या ३ दशकांपेक्षा जास्त काळ सचिन तेंडुलकरसारखं दिसणाऱ्या बलवीर चंद यांचं आयुष्य चांगलं सुरु होतं. टेलिव्हीजन शो, जाहीरातींमधून बलवीरला चांगलं उत्पन्न मिळत होतं. सचिन तेंडुलकरसारख्या लुक्समुळे बलवीर चंद, मुंबईतील ‘गोली वडापाव’ या फुड आऊटलेटचे ब्रँड अँबेसेडरही बनले.

करोनाचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर झालं आणि बलवीर यांचा हक्काचा रोजगार तुटला. खाद्यपदार्थांची दुकानं बंद असल्यामुळे बलवीर यांना मालकांनी सध्या तुमची गरज नाही, ज्यावेळी सर्व परिस्थिती रुळावर येईल त्यावेळी तुम्हाला बोलवून घेऊ असं सांगितलं. यानंतर बलवीर यांनी पंजाबला आपल्या गावी जाण्याचं ठरवलं. पण त्यांच्यासमोरचं संकट अजुन संपलेलं नव्हतं, गावाला पोहचल्यावर त्यांना करोनाची लागण झाल्याचं समजलं. १० जून रोजी बलवीर पंजाबमधील सहलोन या आपल्या गावी पोहचले. यानंतर त्यांच्यासह सर्व परिवाराला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता त्यांना अलगीकरण कक्षात हलवण्यात आलं आहे.

१९९९ साली भारताच्या कसोटी सामन्यादरम्यान सुनिल गावसकर यांनी बलवीर चंद यांना समालोचन कक्षात बोलावलं होतं. या सामन्यानंतर बलवीर यांच्या प्रसिद्धीत भर पडली. “यानंतर गावसकरांनी मला ताज हॉटेलमध्ये सचिन सरांची भेट घालून दिली. माझ्याकडे काही फोटोग्राफ होते त्यांच्यावर मी सचिन सरांची सही मागितली. त्यांनीही लगेच आपली ऑटोग्राफ दिली…मी यावेळी त्यांना सांगितलं की हे तुमचे नाही माझे फोटो आहेत. त्यावेळी काही क्षणासाठी सचिन सरांनाही धक्का बसला होता.” बलवीर हिंदुस्थान टाईम्सशी बोलत होते.

यानंतर बलवीर यांनी MRF, Toshiba, Reynolds, TVS अशा अनेक ब्रँडच्या जाहीरातींमध्ये सचिनसोबत काम केलं. याव्यतिरीक्त काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही बलवीर यांना सचिनचा डुप्लिकेट म्हणून छोट्या-मोठ्या भूमिका मिळाल्या होत्या. याव्यतिरीक्त मुंबईत अनेक कार्यक्रमांमध्ये बलवीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जायचं. “सचिनसारखा चेहरा असल्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली, पण त्यांच्याइतके पैसे कधीच नाही मिळाले. पण मी चांगलं लिहू शकतो, यानंतर मी माझी नवीन सुरुवात करेन अशी मला आशा आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर माझी नोकरी मला परत मिळेल या आशेवर कायम असल्याचं बलवीर यांनी सांगितलं.