भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने फादर्स डेच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने आपल्या वडिलांच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी खास झोपाळा तयार केला आहे. जेव्हा मी अस्वस्थ असतो आणि मनात विविध प्रकारचे विचार येतात तेव्हा मी या झोपाळ्यावर बसतो, असे सचिनने सांगितले.

व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले, ”आपल्याकडे अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपल्यासाठी टाइम मशीन म्हणून काम करतात. यात गाणे, गंध, आवाज किंवा चव यांचा समावेश आहे. माझ्यासाठी, ही गोष्ट माझ्या वडिलांच्या बालपणाशी संबंधित आहे जे मला नेहमीच त्यांच्या आठवणींच्या प्रवासात घेऊन जाते. फादर्स डेच्या निमित्ताने मला ती खास गोष्ट तुमच्या सर्वांसह शेअर करायची आहे.”

हेही वाचा – क्रिकेटमधून निवृत्त होऊन ८ वर्ष झाली, तरीही सचिनचा ‘जलवा’ कायम!

या व्हिडिओमध्ये सचिन म्हणतो, ”आज मी तुम्हाला काही खास दाखवू इच्छितो, याच्याशी संबंधित भावना माझ्यासाठी खूपच खास आहेत. हे एक लहान घर आहे, जिथे माझे वडील लहानाचे मोठे झाले. हे किती जुने आहे याची आपण कल्पना करू शकता. मी नेहमी यावरच बसतो, म्हणून जेव्हा जेव्हा मनात वेगवेगळे विचार येतात तेव्हा मला वेगळे सामर्थ्य मिळते.”

केवळ सचिनच नव्हे, तर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांचा सन्मान केला. विराट कोहली, शिखर धवन आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी या खास दिवशी आपल्या वडिलांचे आभार मानले.