क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला नुकताच हॉल ऑफ फेम हा प्रतिष्ठेचा सन्मान ICC कडून प्रदान करण्यात आला. २४ वर्षांच्या समृद्ध अशा कारकिर्दीला ICC ने हा सन्मान प्रदान करून सलाम केला. सचिनने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले आणि क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचे स्थान प्राप्त केले. सचिन निवृत्त होऊन ५ वर्षांपेक्षा अधिकच कालावधी झाला, तरी देखील चाहत्यांचे सचिनवरील प्रेम अगदी आधीसारखेच आहे. पण लाखोंच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन मात्र ”सुलतान ऑफ स्विंग’च्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे.

सचिनने गुरुवारी इंग्लिश संगीतकार मार्क नॉफ्लरची भेट घेतली आणि त्याच्या सोबत एक फोटो काढून तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोसहित त्याने एक कॅप्शनदेखील पोस्ट केली. त्याने लिहिले की मार्क नॉफ्लरची भेट घेणं हे कायमच सुखावह असतं. त्याच्यासोबत नाश्ता करताना संगीत, खेळ आणि जीवनाबाबतच्या गप्पा मारताना मजा आली. मार्क नॉफ्लर हा उत्तम संगीतकार, व्यक्ती आणि सुलतान ऑफ स्विंग आहे.

सचिन सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतो आणि आपल्या चाहत्यांशी कायम संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपल्या जीवनातील अनेक लहान मोठ्या गोष्टी कायम ट्विट किंवा इतर सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याचप्रकारे त्याने मार्क नॉफ्लरशी झालेल्या भेटीचीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. मार्क नॉफ्लर याला ४ ग्रॅमी पुरस्कार आणि संगीतविश्वातील ३ डॉक्टरेट पदवी मिळालेल्या आहेत.