साल २०१२, रवी भागचंडका हे निर्माते सचिन तेंडुलकरकडे गेले आणि तुझ्या आयुष्यावर आधारित सिनेमा करावा, असे त्यांनी सचिनला सांगितले. त्या वेळी या चित्रपटात काम करणार नसल्याचे प्रथमदर्शनी सचिनने सांगितले. त्याचबरोबर या चित्रपटात कल्पनाशक्तीला वाव नसावा, तो वास्तवावर आधारित असावा, असे सचिनने सांगितले.

‘‘माझ्या आयुष्यावरील या चित्रपटात कल्पनाशक्तीला वाव नाही. कारण सारे काही जे घडले आहे तेच दाखवण्यात आले आहे. माझ्या आयुष्यात काय घडले हे लोकांना माहिती आहे. जर मी ५५ धावा केल्या असतील तर त्या १५५ केल्या, असे चित्रपटात मांडता येणार नाही. निर्माते रवी यांनी वास्तववादी आयुष्यावर हा सिनेमा असेल, अशी ग्वाही मला दिली,’’ असे सचिनने सांगितले.

या चित्रपटाविषयी सचिन पुढे म्हणाला की, ‘‘मला स्वत:विषयी बोलताना काहीसे अस्वस्थ वाटते. त्यामुळे माझ्यावर अन्य व्यक्तींनी बोललेले मला आवडते. भारताकडून क्रिकेट खेळायचे हे माझे स्वप्न होते आणि ते स्वप्न जगत असताना अन्य गोष्टी घडत गेल्या. मी माझ्या स्वप्नांची पूर्तता करीत गेलो. ही फक्त माझी स्वप्ने नव्हती, ती कोटय़वधी लोकांची होती आणि हेच या चित्रपटात दाखवले गेले आहे.’’

या चित्रपटात काय पाहायला मिळेल, याबद्दल सचिन म्हणाला की, ‘‘मी धावा करताना किंवा माझ्या आयुष्यातील चढ-उतार सुरू असताना माझ्या मनात नेमके काय सुरू होते ते या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वासमोर आणण्याचा हा एक प्रयत्न असेल. यामध्ये माझी आई, भाऊ, पत्नी यांनी माझ्याबद्दल मते व्यक्त केली आहेत. त्याचबरोबर माझ्या कौटुंबिक नातेसंबंधांवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.’’

‘सचिन, अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स इर्सकिन यांनी केले आहे.

 

सचिन-मोदींची सिनेमा की बात

नवी दिल्ली : आपल्या जीवनावर आधारित चित्रपटाबाबत माहिती देण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी चित्रपटामध्ये नेमके काय असणार आहे, याची माहिती सचिनने मोदी यांना दिली.

‘‘मी काही कारणास्तव दिल्लीमध्ये आलो होतो. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन आगामी चित्रपटाबद्दल त्यांना माहिती दिली. या चित्रपटामध्ये नेमके काय आहे, याबद्दल मी त्यांना माहिती दिली आणि त्यांनीही मला सकारात्मक प्रतिक्रिया दिली,’’ असे सचिन म्हणाला. ‘सचिन, अ बिलियन ड्रीम्स’ हा सचिनच्या आयुष्यावर आधारित सिनेमा २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सचिन या भेटीतील चर्चेबाबत म्हणाला की, ‘‘मोदी यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर हा चित्रपट पुढच्या पिढीसाठी आदर्शवत ठरेल, त्याचबरोबर आयुष्यातील चढउतारांमध्ये काय करावे, हेदेखील त्यांना शिकता येईल. तू ज्या प्रकारे आव्हानांचा सामना केलास त्यामधून प्रत्येकाला शिकता येईल, असे मोदी यांनी मला सांगितले. त्याचबरोबर या चित्रपटासाठी मला शुभेच्छाही दिल्या.’’

या वेळी एक खास संदेशही मोदी यांनी सचिनला दिला. याबाबत सचिन म्हणाला की, ‘‘मोदी यांना भेटून मला अतीव आनंद झाला. या वेळी त्यांनी मला एक संदेशही दिला. ‘जो खेले, वही खिले’ असा हा सुंदर संदेश होता. एका खेळाडूसाठी हा फार मोठा संदेश आहे, माझ्यासाठी हा संदेश फार मोलाचा आहे.’’

मोदी यांना भेटण्यासाठी सचिनबरोबर त्याची पत्नी अंजलीही होती. मोदी यांनी ‘ट्विटर’वरून सचिनच्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘सचिनबरोबर फार चांगली बैठक झाली. त्याच्या आयुष्याच्या प्रवासावर आणि त्याने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्याच्याकडून भारतीयांना प्रेरणा मिळत राहील,’’ असे मोदी यांनी ‘ट्विटर’वर म्हटले आहे.