मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातील प्रतिभावंत आणि महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतीय संघासाठी त्याने २४ वर्षांची समृद्ध कारकिर्द घडवली. त्याच्याकडे सध्या सारं काही आहे, पण तरीहीदेखील सध्या सचिन एका गोष्टीच्या शोधात आहे. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू कार आणि बाईक्सचे चाहते आहेत. सचिनकडेदेखील अनेका महागड्या कार आहेत. पण सचिन व्यावसायिक क्रिकेटपटू झाल्यानंतर त्याने स्वत:च्या कमाईतून त्याची पहिलीवहिली कार खरेदी केली होती. त्या कारशी तो अजूनही भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिनने चाहत्यांना आपल्या पहिल्या कारच्या मालकाचा शोध लावायचं आवाहन केलं आहे.

सचिन ‘इन द स्पोर्टलाइट’ शोच्या एका विशेष मुलाखतीत बोलताना म्हणाला की आता त्याच्याकडे त्याने विकत घेतलेली पहिली कार नाही. ज्या माणसाने ती खरेदी केली आहे त्याच्याशी संपर्क साधायला मला नक्की आवडेल. सचिन बोलताना म्हणाला, “माझी पहिली कार मारूती-८०० होती. दुर्दैवाने ती कार आता माझ्याजवळ नाही. माझी पहिली कार मला परत मिळाली तर मला खूप छान वाटेल. जेवढे लोक माझं बोलणं ऐकत असतील, त्या साऱ्या चाहत्यांना माझं आवाहन आहे की कुणाला त्या कारविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.”

“माझ्या घराजवळ एक मोठा खुला ड्राइव्ह-इन मुव्ही हॉल होता. तिथे लोक आपापली कार पार्क करुन चित्रपट पाहात असायचे. त्यावेळी मी माझ्या भावासोबत बाल्कनीमध्ये तासनतास उभा राहून तेथील कार्स बघत असायचो”, अशी आठवणदेखील सचिनने सांगितली.

सचिनने त्याचे आदर्श भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. “एकदा मी ड्रेसिंगरुमजवळ उभा होतो. खेळाडू सामन्यासाठी कशाप्रकारे तयार होतात हे मला पाहायचं होतं. त्यावेळी मला ड्रेसिंग रुममध्ये गावसकर यांनी बोलावलं. मला अजूनही आठवतं की ते एका कोपऱ्यात शेवटच्या सीटवर बसले होते. योगायोगाने मीदेखील रणजी ट्रॉफी खेळायला सुरुवात केल्यानंतर त्याच सीटवर जाऊन बसलो होतो. तो खूपच छान योगायोग होता”, असा किस्सा सचिनने नमूद केला.