क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने १६ नोव्हेंबर २०१३ ला शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने विक्रमांचा रतीब घालत २४ वर्षांची समृद्ध क्रिकेट कारकिर्द घडवली. या कारकिर्दीनंतरही तो विविध गोष्टींमुळे कायम चर्चेत असतो. सध्या तो एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. त्या व्हिडीओमध्ये सचिनने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे तसेच तरूण पिढीला मार्गदर्शन केले आहे.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने सामाजिक बांधिलकी जपली. तेंडुलकर विविध माध्यमातून समाजकार्य करत असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी तेंडुलकरने महाराष्ट्रातील इर्लेवाडी या दुर्गम भागात विद्यार्थ्यांना प्रेरणादायक असा संदेश दिला. हा संदेश त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिला असून त्यात त्याने विद्यार्थी असताना डोक्यात कोणता विचार होता, हे सचिनने सांगितले.

तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने इर्लेवाडीतील मुलांशी व्हिडीओ कॉलने साधलेला संवाद शेअर केला आहे. “मी जेव्हा विद्यार्थी होतो, तेव्हा भारतासाठी क्रिकेट खेळावं हाच विचार माझ्या डोक्यात होता. क्रिकेटपटू बनण्याचे आणि टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. माझा हा प्रवास वयाच्या ११ व्या वर्षी सुरू झाला. पहिल्यांदा जेव्हा मी निवडीसाठी गेलो होतो, तेव्हा मला नाकारण्यात आले होते. त्यावेळी मी खूप निराशही झालो होतो. पण त्यानंतर माझा निर्धार आणि मेहनत करण्याची तयारी वाढली. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर परिश्रम घ्या, शॉर्टकट कधीही वापरू नका”, असा संदेश सचिनने दिला.

याच व्हिडीओत क्रिकेटमधील यशाचे श्रेय सचिनने आई, भाऊ अजित, नितीन, बहीण सविता, लग्नानंतर अंजली, सारा, अर्जुन, काका-काकु आणि आचरेकर सर या साऱ्यांना दिले.