पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला, पायाचे स्नायू दुखावल्यामुळे सामना अर्ध्यावर सोडावा लागला. त्याची दुखापत फारशी गंभीर नसली तरीही अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरला खबरदारीचा उपाय म्हणून विश्रांती देण्यात आली. मोहम्मद शमीनेही या सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत टिच्चून मारा करत हॅटट्रीक नोंदवत आपली निवड सार्थ ठरवली. या सामन्यानंतर भुवनेश्वर आता दुखापतीमधून सावरतो आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आता भुवनेश्वरची निवड करायची की शमीची हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : या धोनीचं करायचं काय? टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर गहन प्रश्न

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मात्र या प्रश्नावर आपल्यापरीने तोडगा काढला आहे. सचिन तेंडुलकरने व्यक्त केलेल्या मताप्रमाणे, वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात भारताने भुवनेश्वर कुमारला संधी द्यावी. तो Star Sports वाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलत होता. गुरुवारी मँचेस्टरच्या मैदानात भारत आणि वेस्ट इंडिज हे प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत.

“भुवनेश्वर शाररिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे, ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. त्याला सराव करताना मी पाहिलं, त्याची देहबोली मला सकारात्मक वाटली. आगामी विंडीजविरुद्ध सामन्यात जर मला शमी आणि भुवनेश्वर या दोन खेळाडूंपैकी कोणा एकाची निवड करायला सांगितली तर मी भुवनेश्वरला संधी देईन. माझ्यामते भुवनेश्वर ख्रिस गेलला अडचणीत आणू शकतो. माझ्या अखेरच्या सामन्यामध्ये गेल भुवनेश्वरविरुद्ध खेळताना चाचपडत होता. शमीसाठी ही गोष्ट थोडी दुर्दैवी ठरणारी आहे. मात्र विंडीजविरुद्ध सामन्यात भुवनेश्वरला संघात संधी मिळायला हवी.” सचिनने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – World Cup 2019 : केदार जाधव चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय !