मोहम्मद शामीला बाद करून जेम्स अँडरसननं केवळ भारताचा डाव संपुष्टात आणला नाही तर त्यानं ग्लेन मॅग्राथ या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजाला मागे टाकलं. मॅग्राथनं 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 बळी बाद केले होते. शामी हा अँडरसनचा 564 वा बळी ठरला आणि त्यानं मॅग्राथला हा बळी घेत मागे टाकलं. 564 बळी मिळवण्यासाठी अँडरसनला 143 कसोटी सामने खेळावे लागले. कसोटीमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा जलदगती गोलंदाज असा विक्रमही जेम्स अँडरसननं या बळीसह केला आहे.

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनं ट्विट करून जेम्स अँडरसनचं कौतुक केलं आहे. मॅग्राथपेक्षा जास्त बळी मिळवणं ही अतुलनीय कामगिरी असल्याची प्रशंसा सचिननं केली आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अशा गोलंदाजांमध्ये तुझा समावेश आहे अशी स्तुतीसुमनं सचिननं अँडरसनवर उधळली आहेत.  सोमवारी खेळ सुरू होताना, अँडरसनच्या खात्यात 561 बळींची नोंद होती. त्यानं दोन गडी बाद केले आणि मॅग्राथच्या विजयाची बरोबरी केली. त्यानंतर शामीची विकेट घेत अँडरसनने मॅग्राथला मागे टाकलं. कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये 800 बळींसह मुरलीधरन आघाडीवर असून त्याखालोखाल 708 बळींसह शेन वॉर्न दुसऱ्या व 619 बळींसह अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहेत.

अँडरसन हा 564 बळींसह चौथ्या स्थानावर असून जर वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर अँडरसन हा कसोटीमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा अव्वल तेज गोलंदाज ठरला आहे. मुरलीधरन, वॉर्न व कुंबळे हे फिरकीपटू होते व जलदगती गोलंदाजांना असलेला दुखापतीचा धोका लक्षात घेता 36 वर्षांच्या अँडरसनने मारलेली मजल कौतुकास्पद आहे आणि त्याचीच दखल त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतली आहे.